Twitter : @milindmane70

मुंबई

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू झाली, तेव्हा भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्रीपदाचा अडीच वर्षाचा फार्मूला मान्य केला नाही. त्यावेळेला त्यांनी तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ?अशी विचारणा केली. त्यावेळी आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवलं, तेव्हा शिंदे यांचं नाव समजताच भाजपाने युती तोडली, असा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, आज हीच भाजपा भंपकपणा करत आहे आणि त्याच एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन मागील दीड वर्षापासून राज्य चालवत आहेत, यावरून भाजप किती कारस्थानी आहे, हे स्पष्ट होत असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षात फूट पडण्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्याकडे आले होते, त्यांना तेव्हा मी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे काय? असे विचारले होते, असे उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले होते. तसेच 2019 मध्ये भाजपने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फार्मूला पाळला असता तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत

सन 2019 मध्ये केवळ अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्मुल्यावरून शिवसेना – भाजप युती तुटल्याचे म्हटले जाते. पण 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपचा विरोध होता, म्हणून युती तुटली असे उद्धव ठाकरे यांनी कधीही म्हटले नव्हते. परंतु आज संजय राऊत यांनी याबाबतची माहिती देऊन मोठा गौप्यस्फोट केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

सन 2019 च्या निवडणुकीपूर्वी तेव्हा भाजपामध्ये असलेले एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेना – भाजपा युती तोडत असल्याचे सांगितले होते. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे माहित नसावे, मोदी कुणाला चुकीची माहिती देत आहेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरामधून भाजपा व मोदी यांना विचारला आहे.

भाजपा नेतृत्वाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे 2019 मध्ये दुसऱ्यांदा युती तुटली, तेव्हा एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्यात भाजपने नकार दिला होता. त्यामुळे शिवसेना – भाजपा युती तुटली, असा दावा करतानाच त्याच एकनाथ शिंदेंना भाजपने आता मुख्यमंत्री केले यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

2014 मधील पत्रकार परिषदेचा तो क्षण, याच वेळी एकनाथ खडसे यांनी शिवसेनेसोबत युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. सोबत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस

राज्यात 25 वर्षापासून शिवसेना – भाजपा युती होती. या काळात मोदी आणि अमित शहा कुठेच नव्हते. सन 2014 मध्ये गुजरातची ही जोडगोळी दिल्लीत अवतरली आणि त्यांनी युती तोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 चा दाखला देत आहेत, पण मुळात 2014 मध्ये शिवसेना – भाजपा युती तुटली होती, याबाबत तेव्हा भाजपामध्ये असलेले एकनाथ खडसे यांनी फोन करून ही माहिती दिली होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

भाजप – शिवसेना सत्ता स्थापन होत नसल्याने शरद पवार यांच्या पुढाकाराने माहविकास आघाडीचा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांचा समावेश होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता स्थापनेच्या वेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते की, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते मंत्री होणार आहेत, एकनाथ शिंदे हे ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली आमचे सीनियर मंत्री काम करू शकणार नाहीत, तेव्हा तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. अशी गळ घातल्याने व शरद पवारांच्या आग्रहामुळे मी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे उद्धव ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तसेच भाजपाने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नाही हे देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मुख्यमंत्री कोणाला करणार हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले नाही, तोच धागा पकडत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले होते, असा दावा केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे शिलेदार – डावीकडून शरद पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस) , उद्धव ठाकरे (शिव सेना) आणि बाळासाहेब थोरात (कोंग्रेस)

पत्रकार परिषदेत शरद पवार व अजित पवार यांच्या झालेल्या भेटीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे कदाचित अजित पवार यांना म्हणाले असतील की 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत सामील व्हा!. या महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच काय गुप्त राहत नाही, पहाटेच्या शपथविधीप्रमाणे परत फिरा, असा सल्ला अजित पवारांना दिला असेल असे सांगून संजय राऊत म्हणाले की, राजकारणात काहीही घडू शकते. सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये कोणीही खुश नाही, ना जनता, ना मंत्री. या सरकारची अवस्था अत्यंत बिकट आहे व राजकारणात उलटापालट होईल, त्याची दुसरी बाजू तुम्हाला लवकरच कळेल, असे सांगून नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर संजय राऊत यांनी दिली नाही ना? अशी चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here