@maharashtracity

शिवसेनेची पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्याकडे चौकशीची मागणी

धुळे: अक्कलपाडा ते हनुमान टेकडी पाणीपुरवठा योजनेच्या कामात अक्कलपाडा धरणात (Akkalpada Dam) जॅकवेलच्या डीझाईनमध्ये 177 मीटर लांबीत बदल करून फक्त 27 मीटर लांबी ठेवण्यात आली आहे. ही लांबी का कमी करण्यात आली, यातील गौडबंगाल काय, असा प्रश्‍न शिवसेनेने (Shiv Sena) उपस्थित केला आहे. या प्रकरणाची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी सखोल चौकशी करावी, मागणीही शिवसेनेने केली आहे.

याबाबत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले. त्यानुसार धूळे महापालिकेतर्फे (Dhule Municipal Corporation – DMC) सन 2015 पासून 136 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महानगरात तब्बल 350 किलोमीटर जलवाहीनी टाकण्यात आली आहे. नवीन सात जलकुंभ बांधुन तयार आहेत. सन 2019-20 पासुन 133 कोटीची अक्कलपाडा ते हनुमान टेकडी योजना जवळपास 80% पूर्ण झाली आहे.

या योजनेचा फायदा असा आहे की अक्कलपाडा धरणातून जलवाहीनीद्वारे येणारे पाणी 0% गळतीने थेट हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ग्रॅव्हिटीने येणार आहे. यात मनपाच्या वीजबिलात 80 ते 90 लक्ष रुपये महिन्याला बचत होणार आहे.

परंतू भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या मनपा सत्ताधाऱ्यांनी या योजनेचा बट्ट्याबोळ करून ठेवला आहे. अक्कलपाडा ते हनुमान टेकडी पाणीपुरवठा योजनेत अक्कलपाडा धरणाच्या काठापासून धरणाच्या मध्यभागात जवळपास 177 मीटर जॅकवेल योजनेच्या मंजूर डिझाईनमध्ये 150 मीटर लांबी कमी करून वर्तमान परिस्थितीत फक्त 27 मीटर लांबी कायम ठेवली आहे.

ही लांबी कमी करण्याचे कारण काय, त्यामागील गौडबंगाल काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. याकरीता धुळे मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) ठेकेदार आणि शिवसेनेचे शिष्टमंडळ, अशी एकत्रीत आपल्या उपस्थितीत बैठक घ्यावी, अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे, संजय वाल्हे, समाधान शेलार, छोटू माळी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here