@maharashtracity

महिला आघाडीची मागणी

धुळे: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेतर्फे धुळे (Dhule Shiv Sena) शहरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. याला उत्तर देणाऱ्या भाजप कार्यकर्त्याविरुद्ध दाखल गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे.

शहरात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याची घटना घडली होती. यातून भाजपच्या कार्यालयावर दगडफेक, शिवीगाळही करण्यात आली.

या प्रकाराचा निषेध करत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीने केली.

यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात, भारतीय जनता युवती मोर्चाच्या प्रदेश सहसंयोजिका अमृता पाटील, नगरसेविका प्रतिभा चौधरी, भारती माळी, वंदना भामरे, योगिता बागूल, सुरेखा देवरे, विमलबाई देवरे उपस्थित होत्या.

याबाबत भाजपच्या महिला आघाडीने जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्यानंतर मिळालेला जामीन हा सर्वानी उघड्या डोळ्यांनी पाहिला. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेला हा सर्व प्रकार निंदनीय आहे.

एका केंद्रीय मंत्र्याला दिलेली वागणूक राज्याच्या राजकरणाला लाजवणारी ठरली आहे. धुळे शहरातही शिवसेनेने नारायण राणे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. तीत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर दगडफेक, शिवीगाळ करत त्यांना चिथावणी देण्याचा प्रकार घडला.

महापालिकेसमोर प्रतीकात्मक पुतळा जाळला. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडला. मात्र, शासनाच्या दबावापुढे पोलिस प्रशासन झुकले. याचा आम्ही निषेध करतो. उलट भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here