@vivekbhavsar

सोमवार पासून सुरु होणारा नवीन आठवडा केंद्रात आणि राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी नोंदविणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल (Reshuffle of union cabinet) यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत कुठल्या नेत्याचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करायचा आणि कुठल्या विद्यमान मंत्र्यांना नारळ द्यायचा याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली.

याच बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये (NDA) कोणत्या पक्षांचा समावेश करायचा याचाही निर्णय घेतला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांना जुलैमधील संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होण्याआधी नवीन मित्र जोडून मंत्रिमंडळ फेरबदल किंवा विस्तार करायचा आहे. त्यामुळे ही बैठक आणि मंत्रिमंडळ फेरबदल या दोन घटना महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडी सरकारचे (MVA government) भवितव्य ठरवणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनांक १८ जून रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यापासून राज्यातील राजकारणात वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ठाकरे सरकार पडणार का? भाजप कोणासोबत युती करणार? भाजपसाठी शिवसेना हा त्यांचा जुना सहकारी सोयीचा ठरेल की राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार स्थापन करण्यास भाजप प्राधान्य देईल? काँग्रेस पक्षाचे काय होणार?

सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला अन्य काही पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. अशावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली एक गट फुटणार की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shiv Sena) फुटणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. तशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी स्वबळाची आणि पुढच्या सगळ्या निवडणूक स्वतंत्र लढण्याची भाषा सुरू केल्याने काँग्रेस (Congress) नेमके काय करणार आहे याबाबतही तर्क-वितर्क सुरू आहे. यातील प्रत्येक मुद्द्याचा परामर्श घेऊ या.

या सगळ्या घडामोडीत काही घटनाक्रम जाणून घेऊ आणि मिसिंग लींक जोडण्याचा प्रयत्न करूया. मोदी – ठाकरे भेटीच्या दोन दिवस आधी भाजपचे सह प्रभारी मुंबईत होते. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन संघटना बांधणी आणि अन्य राजकीय विषयांवर मार्गदर्शन केले.

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीचा समारोप करताना ते एवढेच म्हणाले होते की, ‘आप के मन मे जो सवाल है, उसका जवाब बहुत जल्दी मिलने वाला है। सब कुछ ठीक होनेवाला है।

भाजपच्या याच सूत्राने दावा केला की, राज्यातील ठाकरे सरकार पाडायचे नाही असा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश आहे. सरकार पडणार नाही पण सरकार बदलणार हे निश्चित आहे. गेल्यावेळी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करतांना जी फसगत झाली आणि भाजपला बॅकफूटवर जावे लागले होते, तसे आता होणार नाही. सगळे काही अत्यंत सुरळीत होईल, सत्तांतर कुठल्याही अडथळ्याविना पार पडेल, असा दावा या सूत्राने केला.

भाजपचे सह प्रभारी दोन दिवस बैठक घेऊन दिल्लीला रवाना झाले आणि आठ तारखेला भाजपचे प्रभारी यांना अचानक सांगण्यात आले की तुम्हाला मुंबईला जायचे आहे. सकाळी 11 वाजता मोदी- उद्धव भेटीची वेळ ठरली आणि प्रभारीना मुंबईत जाऊन भाजप नेत्यांची बैठक घेण्यास सांगण्यात आले. वास्तविक पक्षाच्या प्रभारींचा दौरा असा अचानक ठरत नसतो आणि प्रभारी येणार असतील तर सह प्रभारी मुंबईतच थांबले असते. पण ही घडामोड उद्धव-मोदी यांच्या भेटीच्या वेळी ठरली, याकडे कानाडोळा करता येणार नाही.

सात तारखेला उद्धव ठाकरे यांच्याकडून मोदींना फोन करून वेळ मागितली जाते. मोदी देखील कुठलाही विलंब न लावता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ देतात आणि प्रभारींना मुंबईत पाठवतात. यामागे अत्यंत नेटके नियोजन असावे असेच म्हणावे लागेल. मोदी आणि उद्धव यांची ही भेट एका उद्योगपतीच्या मध्यस्थीने घडून आली आहे हे देखील महत्त्वाचे आहे.

भाजपमधील सूत्रांच्या दाव्यानुसार उद्धव ठाकरे हे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्कात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार(NCP Chief Sharad Pawar) हे अन्य एका मध्यस्थामार्फत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या संपर्कात आहेत. शरद पवार काय करत आहेत, हे फ़क्त प्रफुल पटेल (Praful Patel) आणि कदाचित सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाच माहित असावे. अजित पवार किंवा राष्ट्रवादीचे अन्य नेते यांना याची कसलीही खबरबात नसेल, असा दावा भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

याच नेत्याने असेही सांगितले की, मोदी हे भाजप-शिवसेना युतीसाठी अनुकूल आहेत. त्यांना राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यात अजिबात रस नाही. अमित शहा हे देखील राष्ट्रवादीसोबत जाण्यास इच्छुक नाहीत असे सूत्रांनी सांगितले.

या ठिकाणी एक बाब अधोरेखित केली पाहिजे की पवारांनी मोदींकडे तीन वेळा विनंती करूनही भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असा दावा केंद्रीय भाजप नेत्याने केला. याचा अर्थ जर महाराष्ट्रात सत्तांतर झालेच तर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ शकतील. दुसरी बाब म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देखील भाजपने शिवसेनेसोबतच जावे आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करू नये, याच मतावर आग्रही असल्याचे सांगितले जाते.

भाजप राष्ट्रवादी सोबत का जाणार नाही यामागचे कारण असे सांगितले जाते की, 2024 ची लोकसभा निवडणूक ही भ्रष्टाचार विरोधातील लढाई, भ्रष्ट नेत्यांना घरी बसवा, हाच मुद्दा घेऊन लढण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे. भ्रष्टाचार विरोधात (anti corruption)
रणशिंग फुंकण्याची भाजपने रणनीती आखली आहे. म्हणूनच राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहिलात तर भाजपला या मुद्यावर निवडणूक प्रचार करता येणार नाही, यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झालेले आहे, अशी माहिती भाजप नेत्याने दिली.

मग दुसरा मुद्दा उपस्थित होतो की जर भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असतील तर दोन दिवसांपूर्वी शिवसेना भवनसमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला तो होण्याचे काही कारण नव्हते. यातून दोन पक्ष जवळ येण्याची प्रक्रिया थांबू शकते, असा दावा दोन्ही पक्षातील काही नेते करत आहेत. सक्त वसुली संचलनालय (ED) अर्थात ईडीने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांनाही दोन दिवसापूर्वीच अटक केली. शर्मा शिवसेनेशी संबंधित आणि पक्षाचे पराभूत उमेदवार आहेत. शर्मांची अटकदेखील या चर्चेमध्ये खोडा घालू शकेल, असा दावा केला जात आहे.

खरेतर राजकारणात मोठा निर्णय घेतांना छोट्या प्याद्यांचा बळी गेला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यास नियमाने शर्मा किंवा सेना भवनासमोरील वादाकडे दोन्ही पक्ष दुर्लक्ष करतील, अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे काय होईल, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कुठल्याही बापाला आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षित व्हावे असे वाटणे स्वाभाविक आहे. राजकारणात तर हे कटाक्षाने पाळले जाते. शरद पवार राजकारणातले भीष्माचार्य असलेले तरी ते आधी बाप आहेत. त्यांनी आतापर्यंत असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले आहे, पदे दिली आहेत. त्यामुळे स्वतःच्या मुलीचं राजकीय करियर सुरक्षित व्हावे असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे.

सुप्रिया सुळे या अभ्यासू खासदार आहेत. त्यांना प्रश्नांची जाण आहे. केवळ वडिलांच्या पुण्याईवर खासदार झाल्या इतके त्यांचे सीमित व्यक्तिमत्व नाही. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले तर ते गैर ठरणार नाही. पण असे होण्यासाठी राष्ट्रवादीला किंवा पवारांना भाजपचे सहकार्य लागेल. यासोबतच प्रफुल पटेल यांच्यामागे लागलेलं ईडी च्या चौकशीचे शुक्लकाष्ठ संपावे, अशीही पवारांची इच्छा असू शकते त्यामुळे पवार देखील दिल्लीमध्ये भाजपच्या संपर्कात आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे (Narayan Rane) यांचा समावेश केला गेला तर त्याचा अर्थ समजावा की भाजप शिवसेनेसोबत जाणार नाही. पण राणे यांना दुर्लक्षित केले तर येणाऱ्या नजीकच्या काळात भाजप आणि शिवसेना राज्यात एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता असेल.

महाराष्ट्रात काँग्रेसच्या आक्रमक आणि आडमुठे धोरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्रस्त आहेत. आता त्यांना काँग्रेसचे ‘ओझे’ वाहून नेणे कठीण जाते आहे, अशी चर्चा शिवसेनेत आहे. त्यामुळे आत्ताच संधी आहे भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करा आणि राज्याच्या राजकारणासह पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत सत्तेची चावी आपल्याच कडे ठेवावी असा दुहेरी विचार करून उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेऊ शकतील, अशी शक्यता आहे.

राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि राष्ट्रवादीला पुढील निवडणुकीत शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकून स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे आणि म्हणूनच आत्ताच्या सरकारमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि ‘व्हिटॅमिन एम’ कमी पडणार नाही याकडे राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांचे लक्ष केंद्रित झालेले आहे.

राज्यात भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करणार असतील तर अजित पवार हे स्वतंत्र गट स्थापन करून या सरकारमध्ये सामील होतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसला बाहेर पडावे लागणार असेल तर काँग्रेस मधला एक गट स्वतंत्र होऊन सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करू शकेल, अशीही शक्यता वर्तवली जाते. एकनाथ शिंदे सेनेतून बाहेर पडून भाजप सोबत जातील, असाही दावा केला जातो.

पण पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या एकूण संख्याबळा च्या दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडले तरच त्यांची आमदारकी शाबूत राहू शकेल. पुन्हा निवडणूक लढवावी लागली, तर निवडून येण्याची खात्री नसल्याने कोणीही आमदार फुटेल याची तूर्तास तरी शक्यता नाही.

राष्ट्रवादीत अजित पवार यांना मानणारे एकूण 54 पैकी 29 आमदार आहेत. तर सेनेत एकूण 56 पैकी 22 आमदार हे एकनाथ शिंदे समर्थक मानले जातात. काँग्रेसमध्येही एका मंत्र्यांकडे 16 आमदार असल्याचा दादा केला जातो.
राष्ट्रवादीला स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी 36 तर शिवसेनेच्या स्वतंत्र गटासाठी 38 आमदारांची गरज लागेल.

अर्थात या जर-तरच्या गोष्टी झाल्या.
प्रत्यक्षात काय होईल, काय घडेल याचा निर्णय येत्या काही दिवसात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच समजू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here