भाजप आमदार आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई: मुंबईतील नालेसफाईबाबत महापौर आणि प्रशासनाला धारेवर धरतांना भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार आणि पक्ष प्रतोद आशिष शेलार यांनी अतिरिक्त पालिका आयुक्त पी वेलारसू यांची तुलना राक्षसाशी केली. तर सचिन वझे प्रकरणात नाव असलेल्या एका मंत्र्याने नालेसफाई कंत्राटदाराला 2 कोटी रुपये वसूल करून देण्याची मागणी केली होती, असा आरोप शेलार (Ashish Shelar) यांनी केला.
मुंबई (Mumbai) शहरातील नाल्यांची सफाई १०७ टक्के झाल्याचा दावा फोल असून ही नालेसफाई नव्हे, तर सत्ताधाऱ्यांची हातसफाई आहे. स्थायी समिती सभापती आणि महापौरांचे (Mayor) हे पाप आहे, असा आरोप करतांना मुंबईकरांना वेठीस धरत असाल तर अतिरिक्त आयुक्त पी वेलारसू (P Velrasu) यांच्या घरासमोर नाल्यातील गाळ नेऊन टाकू, अशा इशाराही आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिला आहे.
नाले सफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर आमदार शेलार यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि पालिका प्रशासनावर (BMC) हल्ला चढवला आणि न झालेल्या कामांची पोलखोल केली.
आमदार शेलार म्हणाले की, अनेक ठिकाणी गाळ तसाच पडून आहे. काही ठिकाणी तर नाल्यावर जलपर्णी उगवली आहे. याला जबाबदार महापालिका प्रशासनही आहे. वेलारसू नावाचा एक राक्षस या शहरात फिरत असून त्यांनी केलेले फोल दावे आहेत. या वेलारसु यांने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ रचला आहे. हे दावे करणाऱ्या वेलारसु आणि त्याचे समर्थन करणारे महापौर आणि स्थायी समिती यांना आम्ही मुंबईकरांसमोर उघडे करु. यांच्या घरासमोर आम्ही गाळ नेऊन टाकू. मुंबईकरांच्या घरात पाणी शिरले तर खबरदार! हे वेलारसू कोण आहेत, कुणाचे काम करतात, कुणाला भेटतात हे सगळे उघड करु.
नालेसफाईच्या कामात दोषी असलेल्या कंत्राटदारांचा संबंध वाझे (Sachin Waze) प्रकरणाशी आहे. वाझे यांनी न्यायालयाला दिलेल्या पत्रात नालेसफाईच्या कामातील कंत्राटदारांकडून (contractor) प्रत्येकी 2 कोटी वसूल करायला मंत्र्यांनी सांगितले होते अशी माहिती उघड केली होती. या दोषी कंत्राटदारांना वाचवण्याचे काम शिवसेनेचे मंत्री करीत आहेत, याचेही उत्तर शिवसेनेने द्यावे, अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी हल्ला चढवला.