@vivekbhavasar

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Can Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल तक्रार दाखल झाली आहे. नारायण राणे यांना अटक होईल की नाही ही कायदेशीर बाब असली तरीही राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने (MVA) राणे यांच्या अटकेची तयारी सुरू केलेली दिसते. राणे यांना अटक झालीच तर त्याचा फायदा कोणाला होईल? – नारायण राणे, शिवसेना, भाजपा की देवेंद्र फडणवीस यांना?

यातील एकेका मुद्द्याचे विश्लेषण करू या. नारायण राणे यांचा प्रवास शिवसेना ते भाजपा व्हाया काँग्रेस (Shiv Sena to BJP via Congress) असा झालेला आहे. मूळचे शिवसैनिक असलेल्या राणे यांच्यात ती आक्रमकता ठासून भरलेली आहे. काँग्रेसमध्ये संधी मिळत नसल्याने त्यांनी २०१८ मध्ये भाजप मध्ये प्रवेश केला. पुढे त्यांना भाजपने राज्यसभेवर (Rajya Sabha) निवडून आणले. गेले तीन वर्ष भाजपामध्ये फारशी संधी न मिळालेले राणे शांत आणि संयमी होते. परंतु, केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागल्यापासून नारायण राणे यांच्यातील आक्रमकपणा पुन्हा उफाळून वर आलेला दिसतो.

संसदेचे अधिवेशन (Parliament session) संपल्यावर राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Rally) सुरू केली आहे. याच एका यात्रेदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना असंसदीय भाषेचा प्रयोग केला आणि त्यातून शिवसैनिक चिडले. त्याचा परिणाम म्हणजे राणे यांच्या विरोधात तीन वेगवेगळ्या शहरात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

मंत्र्यांच्या अटकेची प्रक्रिया काय?

राणे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना अटक होईल की नाही, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्र्यांना अटक करण्याचे प्रोटोकॉल (protocol) असतात. मुळात भारतीय दंड संहितेमध्ये (IPC) अशी तरतूद आहे की मंत्री म्हणून घेतलेला एखादा निर्णय चुकीचा असेल किंवा त्याबद्दल मंत्र्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तरीही त्यांना अटकेपासून संरक्षण आहे. मात्र, मंत्री असले तरी त्यांच्या विभागाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर त्यासाठी सामान्य व्यक्तीला असतो तोच न्याय त्या मंत्राला लागू होतो.

राणे यांचे मुख्यमंत्र्यांविरोधात असलेले वक्तव्य हे एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकेल. दुसरी बाब आता संसदेचे अधिवेशन सुरू नसल्यामुळे राणे यांना अटक करण्यासाठी राज्यसभेच्या सभापतींची परवानगी घेण्याची गरज नसेल.
राणे यांना अटक केल्यानंतर या अटकेच्या कारवाईची माहिती राज्यसभेच्या सभापतींना कळवण्याची कायदेशीर प्रकिया पोलिसांना करावी लागेल.

दरम्यान, नारायण राणे यांनीही कायदेशीर सल्ला घेणे सुरू केले आहे. अटक टाळण्यासाठी ते न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन मिळवू शकतील. ज्येष्ठ विधिज्ञ विनीत नाईक हे त्यांचे कायदेशीर सल्लागार असल्याचे समजते. नाईक हे रिटायर्ड जस्टिस भीमराव नाईक यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे येत्या काही तासातच निश्चित होईल की राणे यांना अटक होते की त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो.

राणेंनी भाजपा हायजॅक केली

केंद्रात मंत्री झाल्यानंतर राणे ज्या पद्धतीने आक्रमक झाल्याचे दिसून येते ते बघता राणेंनी भाजपमध्ये बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे, असे म्हणता येईल. कोकणातील अतिवृष्टीनंतर झालेल्या पाहणी दौर्‍यात त्यांनी विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समक्ष विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना ज्या भाषेत गप्प बसवले होते, ते पाहता राणे फडणवीस यांनाही जुमाणणार नाहीत असे दिसते. भाजपमध्ये मीच नेता आहे अशीच राणे यांची देहबोली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या जन आशीर्वाद यात्रेला जितका उत्तम प्रतिसाद मिळाला आणि ज्या प्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना सोबत घेऊन फडणवीस यांनी ते सतत चर्चेत राहतील याची काळजी घेतली होती, तशीच काळजी राणे देखील घेताना दिसत आहेत. त्यामुळे राणे यांच्या यात्रेतही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र उभे राहत आहे.

खरे तर केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाचा समावेश व्हावा, याचे सर्वाधिकार फडणवीस यांना होते. फडणवीस यांनीच राणे यांच्यासह अन्य तिघा नावांची शिफारस केली होती. अर्थात राणे यांनीही जाहीरपणे फडणवीस यांचे जाहीर आभार मानले आहेत. परंतु, ज्या पद्धतीने राणे भाजपला हायजॅक करत आहेत ते पाहता राणे ही भविष्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकेल.

शांत बसलेले किंवा कुठलेही पद नसलेले राणे कुठल्याच पक्षासाठी लाभदायी नाहीत. राणे हे अत्यंत आक्रमक आणि त्याच वेळी अत्यंत अभ्यासू नेते आहेत. भाजपने त्यांना मंत्रिपद देऊन पक्षासाठी खूप मोठी मत्ता निर्माण केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ज्या पद्धतीने राणे यांनी मंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर कामकाजाला सुरुवात केली, ते पाहता भाजपसाठी राणे ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. परंतु राण्यांच्या आक्रमक स्वभावाला वेसण घालू शकेल एवढी राजकीय ताकद देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपमधल्या कुठल्याही नेत्यात नाही. राणे यांना केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) हेच कंट्रोल करू शकतील. त्यामुळे आजच्या घडामोडीनंतर मोदींकडून राणे यांना समज दिली गेल्यास आश्चर्य वाटणार नाही.

मुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरू नये, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी याआधीही भाजप नेत्यांना समज दिली आहे. राजकीय विरोध असणे वेगळे आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे वेगळे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे, याचा विसर पडत चाललाय की काय असे गेल्या काही दिवसातील घडामोडीवरून दिसते आहे. प्रसाद लाड (Prasad Lad) हे देखील याचे दुर्दवी उदाहरण आहे.

राण्यांच्या वक्तव्याचे राजकीय फायदे – तोटे

भाजप आणि अन्य पक्षातील काही नेत्यांना अजूनही असे वाटते की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढले मुख्यमंत्री नसावेत. जेव्हा कधी भाजपचे सरकार सत्तेवर येईल, त्यावेळी भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस नसावे, असे मानणारा एक मोठा गट भाजपमध्ये सक्रिय आहे. तसाच तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतदेखील आहे. त्यामुळे राणेंचे महत्व वाढणार असेल तर ते या पक्षांना किंवा या लोकांसाठी फायद्याचेच आहे.

अर्थात राणेंची ताकद वाढणे हे शिवसेनेसाठी खास करून कोकणामध्ये पायावर दगड मारून घेण्यासारखे असेल. राणेंकडे आता मंत्रिपद आहे, पाठीशी केंद्राची ताकद आहे. त्या बळावर राणे कोकणातून शिवसेनेला भुईसपाट करण्याची भीती सेनेला वाटते.

परंतु, राणे यांच्या निमित्ताने फडणवीस यांचे महत्त्व कमी होणार असेल तर ते सर्वच पक्षांना हवे आहे. अर्थात फडणवीस यांना महाराष्ट्रातून हद्दपार करणे हे कोणालाही शक्य नाही. ज्यांना फडणवीस माहिती आहे किंवा तसा दावा करतात त्यांना माहित आहे की राजकीय नेता म्हणून फडणवीस हे किती कठोर आहेत.

राजकीय विरोधकांना कसे संपवायचे हे फडणवीस गेल्या पाच सहा वर्षांमध्ये चांगलेच शिकले आहेत. त्याचे प्रत्यक्ष रिझल्ट २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देखील बघायला मिळाले होते. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात भाजपमधील राजकीय चित्र काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here