@maharashtracity

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: सहायक नर्सिंग मिडवाइफरी (ANM) आणि जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM) या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी यंदा सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मंत्रालयात गुरुवारी महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख (Medical education minister Amit Deshmukh) यांनी घेतली. यावेळी ही माहिती देण्यात आली.

यापूर्वी सहायक आणि जनरल नर्सिंग मिडवाइफरी अशा दोन्ही प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या गुणांवर आधारीत करण्यात येत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारीत असेल असे देशमुख म्हणाले.

तसेच वैद्यकीय क्षेत्राची गरज प्रत्येक ठिकाणी लागत असून शाळा, कारखाने, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक यासारख्या ठिकाणी सुध्दा तत्काळ उपचारांसाठी परिचारिका असणे आवश्यक आहे. आगामी काळात परिचारिकांसाठी नवनवीन नोकरीची संधी कशी उपलब्ध होऊ शकेल, कोणता अभ्सासक्रम नव्याने सुरु करण्याची आवश्यकता असल्याने याबाबतचा अभ्यास करुन अभ्यासक्रमांचे नियेाजन करण्याचे यावेळी सुचविण्यात आले.

तर कोविड सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात सरकारी आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळत आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हे सुध्दा स्पष्ट करण्यात आले आहे. किती रुग्णांमागे परिचारिका असाव्यात याचा अभ्यास मंडळाने करणे गरजेचे आहे. इतर राज्यात नेमकी याबाबत काय परिस्थिती आहे याबाबतचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्याच्या सूचनाही देशमुख यांनी यावेळी केल्या.

या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षणसहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here