@maharashtracity
माझगाव येथील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई: मी आजारी असल्याने घरी असलो तरी घराबाहेर पडण्यास असमर्थ नाही. मात्र हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याकडून सफाईदार तलावरबाजीचे धडे घेतलेले असल्याने तलवार (sword) कशी, कधी आणि कोणाच्या विरोधात चालवायची ते मला चांगले अवगत असून मी ती तलवार योग्य वेळी फिरवेनच, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या विरोधकांना विशेषतः शिवसेना (Shiv Sena) व मुख्यमंत्री यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या भाजपला (BJP) दिला आहे.
शिवसेनेचे उपनेते व पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या पुढाकारातून व व प्रयत्नांतून माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आलेल्या शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वरुढ भव्य पुतळ्याचे (Maharana Pratap statue) अनावरण रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले.
याप्रसंगी यशवंत जाधव, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant), माजी राज्यमंत्री सचिन अहिर, स्थानिक आमदार यामिनी जाधव, पालिका सभागृहात नेते विशाखा राऊत, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, ई वॉर्डचे सहायक आयुक्त मनिष वाळुंज यांच्यासह महाराष्ट्रातील रजपूत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“गेल्या काही दिवसांपासून यशवंत जाधव हे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पाठी लागले होते. आजचा दिवस योगायोगाचा आहे. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा दिवस आहे. त्या काळात या शूरवीरांनी जे केले, चेतना जागवली, त्याच पद्धतीने बाळासाहेबांनी चेतना जागवली,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
“माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी घराबाहेर पडलेलो नाही. याचा अर्थ मी बाहेर पडायला असमर्थ आहे असा नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. तलवार जरी हातामध्ये नसली, तरी तलवार कशी गाजवायची हे माझ्या नसानसात भिनले आहे. ती ज्यावेळी गाजवायची, फिरावयाची वेळ येईल त्यावेळी आणि पुढेही फिरवेनच,” असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या विरोधकांना दिला.
ठाकरे म्हणाले, त्या-त्याकाळात या शूरवीरांसोबत जसे मावळे, अनेक वीर त्या-त्यावेळी त्यांच्यासोबत राहीले, त्याचप्रमाणे आपण सर्व असंख्य शिवसैनिक, मावळे माझ्यासोबत आहात, हे माझे भाग्य आहे. वीर महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाविषयी कुणी सांगायची गरज नाही. मात्र प्रेरणा, चेतना कुणाकडून घ्यायची हे आणि नेमका कुणाचा वारसा आपल्याकडे आहे, कुणाचा वारसा आपण पुढे घेऊन जाणार आहोत, हे हा पुतळा उभ्या करण्याच्या कामातून आपण दाखवून दिले आहे.
या शूरवीरांप्रमाणे आपल्याला होता येणार नाही. पण किमान त्यांच्या चेतक या घोड्याप्रमाणेच धन्याच्या प्राण रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारा जीवलग संवगडी होता आले, तरीही पुरेसे आहे. त्यादृष्टीने आपण या थोर शूरवीरांचे, त्यांच्या पराक्रमाचे आपल्याला पूजारी होता येईल. आपण पुतळा बांधून थांबू नये. तर या महान शूरवीरांचा तेजाचा वारसा पुढे नेऊया, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
२० फूट उंच चौथऱ्यावर १६ फूट उंचीचा साडेचार टन वजनी कांस्य धातूचा पुतळा
महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी यशवंत जाधव यांनी २३ एप्रिल २०१८ रोजी संबंधितांची बैठक घेऊन महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला.
महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण आणि त्यांचा पुतळा स्थापित करण्याच्या प्रस्तावाला ५ मार्च २०१९ रोजी मंजुरी मिळाली.
धुळे (Dhule) येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी महाराणा प्रताप यांचा २० फूट उंच चौथऱ्यावर १६ फूट उंचीचा साडेचार टन वजनी कांस्य धातूचा भालाधारी व अश्वारूढ पुतळा साकारला. ८ ऑगस्ट २०१९ रोजी हा पुतळा मुंबईत आणण्यात आला.
तसेच, महाराणा प्रताप चौकात नावीन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरण व विद्युत रोषणाईचे काम करण्यात आले आहे.
येथील वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना बेस्ट बसस्थानकाजवळील एका बेटावर जुने कारंजे आढळून आले. त्याचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित विविध भित्तिशिल्प आजूबाजूच्या त्रिकोणी बेटांवर लावण्यात आले आहेत. तसेच चौक परिसरातील रस्ते सुधारणा देखील करण्यात आली आहे.