@maharashtracity

कुडाळ (सिंधुदुर्ग): स्त्री – पुरुष समानता म्हणजे काय याचे उदाहरण कुडाळ तालुक्यातील पुरुषांनी घालून दिले आहे. गेली बारा वर्षे या तालुक्यातील पुरुष गवळदेव मंदिर येथे वट पौर्णिमेला महिलांच्या बरोबरीने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून उत्सव साजरा करतात.

हिंदू संस्कृतीत स्त्रियांची वटपोर्णिमा संपूर्ण भारत वर्षात साजरी केली जाते. वडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत असतात. यावरून स्फूर्ती घेऊन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व डॉक्टर संजय निगुडकर व त्यांच्या सहकार्यांतर्फे २००९ पासून कुडाळ येथे पुरुषांची वटपौर्णिमा साजरी केली जाते.

वटवृक्षाला सात फेरे मारून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, अशा प्रकारची अपेक्षा व प्रार्थना पुरुष करतात.

यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा समर्थ हात असतो. ती समर्थपणे कुटुंब, संसार सांभाळते म्हणून पुरुषांना आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होता येते. अशी स्त्री, तिचं सहकार्य, तिची साथ जन्मोजन्मी मिळत राहावी, अशा प्रकारची अपेक्षा या उपक्रमातून देणे हा उद्देश आहे.

हा उप्रकम स्त्री-पुरुष समानतेचे एक मूर्तिमंत प्रतीक आहे. स्त्री प्रती असलेला आदर अशा प्रकारच्या उपक्रमातून व्यक्त करताना स्त्री पुरुष समानतेचा एक आगळा वेगळा आदर्श पुरुषांच्या या वटपौर्णिमेच्या निमित्ताने समाजासमोर ठेवलेला आहे. या उपक्रमाला समाजातील विविध स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

धो-धो पाऊस पडत असताना सुद्धा गेली बारा वर्ष चालू असलेली ही पुरुषांची वटपौर्णिमा या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने उमेश गाळवणकर, डॉक्टर संजय निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली
कुडाळ येथे साजरी करण्यात आली.

यावेळी प्रा.अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, प्रा. नितीन बांबर्डेकर, सिद्धेश गाळवणकर, प्रसाद कानडे किरण सावंत, सुनिल गोसावी, संतोष पडते, सुरेश वरक व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here