@maharashtracity

आधुनिक लातूरचे शिल्पकार लोकनेते आदरणिय विलासराव देशमुख यांचा १४ ऑगस्ट २१ रोजी  ९ वा स्मृतिदिन आहे. लातूरकरांसोबतच अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान त्यांनी देशभर वाढविला आहे. त्यांची राजकीय कारकिर्द म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवेचा प्रवास अशीच आहे. लोकसेवेला समर्पित वाटचालीत राज्य आणि देशपातळीवर कार्य करतांना विकासात्मक राजकारण हा त्यांचा जिव्हाळयाचा आणि कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांची राजकीय वाटचाल गावपातळीपासून सतत चढती राहिली. शेतकरी, सामान्य माणूस व विकासापासून वंचीत घटकांना विकासाच्या विविध संधी देण्यासाठी त्यांच्या सारख्या दृष्टया नेतृत्वाची आजही राज्याला आणि देशाला गरज आहे.

आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख यांच क्षेत्र राजकारण असल तरी त्यांच्या मनात कोणत्याही विरोधी विचारा बाबत अभिनिवेश नव्हता. एक संतुलित राजकीय व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये होतं यामुळे राजकारण, समाजकारण, धार्मिक, सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांमध्ये एक वेगळ्या उंचीवर त्यांची दृष्टी पोहोचली होती. लोकशाहीमध्ये एक लोकनेत्याच सर्वांशी जिव्हाळ्याचं नातं असतं असं राजकारणाच्या पलीकडल लोकहिताचे संबंध विधायक कार्य करणाऱ्या सर्वांशी त्यांचे राहिल आहे.

कुटुंबवत्सल व लोकवत्सल: विलासराव देशमुख

लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील एका शेतकरी कुटुंबामध्ये आदरणीय विलासराव देशमुख यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण, प्राथमिक शिक्षण या सर्व कालखंडामध्ये आचार, विचार, संस्कार त्यांना लाभले ते काळया मातीशी नाळ जोडणारे. त्यामुळे विलासराव देशमुख हे वैयक्तिक जिवनात अस्सल कुटुंबवत्सल आणि सार्वजनीक जिवनात लोकवत्सल होते. राजकारणातील पदाचा प्रत्येक टप्प्यावर लोकांशी असलेलं नातं आणि लोकांशी असलेली बांधिलकी त्यांची कधीही कमी झाली नाही. त्यांचा जनसंपर्क अफाट होता. लोकासाठी लोकांमध्ये मिसळून काम करणे हा त्यांच्या नेतृत्वाचा गुणच होता. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये काम करीत असताना ज्या शासनाच्या योजना त्यांच्या संकल्पनेतून आकारल्या त्या बहुतांशी योजना लोकसहभागातून होत्या. विकासात्मक वाटचालीत लोकांचे योगदान ही संकल्पना रूढ झाली. पाहता पाहता हजारोंचे हात विधायक कामात लागले. यासर्व योजना लोकांच्या सहभागातून प्रचंड यशस्वी झाल्या. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील स्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना, आरोग्य योजना, केंद्र सरकार मधील पंचायत राज योजना पाहता येतील. त्यांचं ब्रिदच होतं लोकांचा पुढाकार त्यात शासनाचा सहभाग आणि ते यशस्वी झाल.

विलासराव देशमुख: राजकीय वाटचाल एक दिपस्तंभ

लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकांची स्वपन पाहून ती पूर्ण करणारे नेतृत्व लोकनेता होत असत. यामुळे स्वताची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे राजकारणात आहेत ते फक्त पदनामवालीने क्रमश: पूढे जातात. लोकनेते विलासराव देशमुख यांची राजकीय वाटचाल हा एक संघर्षाचा प्रवास आहे. एका गावचे सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री हा एवढा मोठा प्रवास म्हणजे राजकारणातील पाया ते शिखर हा प्रवास त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. या यशस्वी राजकीय प्रवासात आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करणे, लोकांचा विकास करणे याबरोबर आपली ज्या पुरोगामी विचारांशी बांधिलकी आहे. त्या विचाराच संघटन मजबूत करण हे मोठं कार्य त्यांनी केले. आज राजकारणात कार्यरत असलेल्या सर्वांसाठी लोकशाहीमध्ये एक लोकनेता कसा घडत असतो याचा उत्तम आदर्श म्हणून विलासराव देशमुख यांची राजकीय वाटचाल आपल्याला पाहता येईल. भविष्यात विधायक कार्य करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी त्यांची वाटचाल म्हणजे दीपस्तंभ होय.

महाराष्ट्रातील दिलदार नेतृत्व

आपल्या महाराष्ट्र राज्याने देशाला खूप काही दिले आहे. राज्यातल्या अनेक चांगल्या योजना व विकासाची चांगली धोरणे केंद्र सरकारने वेळोवेळी पथदर्शक म्हणून स्विकारली आहेत. अशा सर्व योजना देशभर राबविल्या आहेत. यातून महाराष्ट्रात देशासाठी कार्य करण्यासाठी एक नेतृत्वाची परंपरा निर्माण झाली आहे. यासर्व नेत्यांनी देशपातळीवर कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व गुणाने देशपातळीवर महाराष्ट्राची उंची वाढविली आहे. या परंपरेत यशवंतराव ते विलासराव आपण अभिमानाने सांगू शकतो.

कोणताही लोकनेता हा त्याच्या कार्यातून चिरकाल राहत असतो आदरणीय विलासराव देशमुख यांनी आधुनिक लातूर आधुनिक महाराष्ट्र निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले आहे. राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये काम करतांना त्यांनी घेतलेले अनेक ऐतिहासिक निर्णय येणाऱ्या पिढीसाठी भविष्यवेधी ठरलेले निर्णय आहेत.

ऋणानुबंध जपणार नेतृत्व

विलासराव देशमुख एक कुटुंबवत्सल लोकवत्सल व्यक्तिमत्व होत. सार्वजनीक जिवनात कोणी मदत केली, सहकार्य केल तर त्यांची आवर्जुन जाणीव ठेवत. राजकारणात स्वार्थ साध्य झाला की लोक पाठ फिरवतात. परंतू विलासराव देशमुख यांनी अनेकांचे ऋणानुबंध कायम जपले. लातूर जिल्हा निर्मितीमध्ये मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे मोठे योगदान आहे याची जाणीव ठेवून लातूर जिल्हा निर्मितीचा रोप्य महोत्सव साजरा करताना आवर्जून बॅरिस्टर अंतुले यांना बोलावल गेल.

या शिवाय आदरणीय विलासराव देशमुख पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाले तेव्हा त्यांच्यासोबत वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांना राज्यमंत्री म्हणून संधी दिली होती. तेव्हा एका कार्यक्रमात विलासरावजी देशमुख म्हणाले “ज्या वसंतदादा पाटलांनी आम्हाला बोट धरून राजकारणातील प्रशासनाचे धडे शिकवले त्यांच्याच नातवाला सोबत घेऊन काम करताना मला अधिक आनंद होत आहे.” अशी शेकडो-हजारो उदाहरणे विलासरावजी देशमुख यांच्या कारकिर्दीमध्ये घडली आहेत.

सहकारातुन समृध्दी

लोकनेते विलासराव देशमुख लोकहिताचे खरेखुरे विश्वस्त असल्याची जाणीव होते. सहकार क्षेत्रातील संस्था चालविल्या तेव्हा संस्थेतून केवळ लोकहित पाहीले. यामूळे सहकारी साखर उदयोग विशेषता सहकारी बॅका यांच्या कामकाजातून समाजातील शेवटच्या घटकांचा विकास झाला. लोकांच्या जीवनात आर्थिक बदल व्हावेत म्हणून सहकार तत्वावर साखर उद्योगाची उभारणी केली. साखर उदयोगातील मांजरा, विलास, रेणा, जागृती, २१ वन हे साखर कारखाने लोकांची जिवनवाहीनी ठरले आहेत. कृषी उत्पादनावर आधारित सर्वाधिक गुंतवणूक असणारा उद्योग म्हणून साखर उद्योगाकडे पाहिलं जात आहे. या साखर उद्योगामुळे स्थानीक पातळीवर रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या, आर्थिक क्रांती होवून शेतकऱ्याचं जीवन सुखी आणि समृद्ध झाल आहे. सर्वागीण विकास साधायचा असेल, तर आर्थिक क्रांतीची गरज आहे. विकासाचे आर्थिक सुत्र त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कृषीविकास, सिंचनसुविधा, सहकारी साखर उद्योग, कृषी पथपूरवठा, कृषी प्रक्रीया उद्योग, पायाभूत सोयी-सुविधा उभारणीतून ग्रामीण अर्थव्यवथा मजबुत केली.

लातूर पाणीदार नेतृत्व

आदरणीय विलासराव देशमुख यांना प्रारंभी पासूनच जाणीव होती. मराठवाडा विशेषता लातूर हा भाग मागासलेला आहे आणि कायमस्वरूपी दुष्काळी आहे. यामुळे येथील शेती, उद्योग आणि लोकजीवनाचा विकास करायचा असेल तर शिक्षण आणि पाणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यामुळे शिक्षण आणि पाणी या दोन घटकासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले.

मराठवाडा स्वतंत्र झाला, लातूर जिल्हा निर्माण झाला तेव्हा लोकजीवन मागासलेलं होतं. त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी अनेक शिक्षण संस्था वाढीसाठी त्यांनी चालना दिली. त्याचप्रमाणे सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

लातूरचा भौगोलिक दृष्टीने विचार करता जिल्ह्याचे चार भाग पडतात. या भागात मांजरा नदीचे खोरे, तेरणा नदी खोरे, मन्याड नदी खोरे आणि बालाघाट पठाराचा प्रदेश आहे. मांजरा नदी ही लातूरची प्रमुख नदी आहे. तेरणा, तावरजा, घरणी या उपनद्या आहेत. तिरु, लेंडी, मन्याड या छोट्या नद्याही बालाघाट पठारात वाहतात. मांजरा व तिच्या या सर्व उपनद्यांना मिळून मांजरा खोरे असं म्हटलं जातं.

मांजरा नदी खोऱ्यामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी धनेगाव येथे मांजरा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून लातूरसाठी पाणी उपलब्ध होत. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातला दुष्काळ कमी करता यावा याकरिता धनेगाव येथील धरणाची उंची वाढविली आहे.

लातूर बॅरेज : जलक्रांतीची संकल्पना

मुख्यमंत्री झाल्यानंतर विलासराव देशमुख यांनी मांजरा नदीवर सहा व तापरजा नदीवर एक बॅरेजेस बांधण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीवर बारमाही पाणी राहणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही नदीपात्रात पाण्याची सिंचनक्षमता वाढली आहे. कोल्हापुरी बंधारे ऐवजी बॅरेजेस बांधून शेतकऱ्यांच्या जीवनात त्यांनी क्रांती घडवली. मांजरा नदीवरील उभारलेले बॅरेजेस हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे. ही योजना लातूर बॅरेजेस म्हणून आज महाराष्ट्रात नावारुपास आली आहे. विलासराव देशमुख यांनी पाण्याचे नवे स्त्रोत निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळावे या हेतूने ही कल्पना मांडली आणि प्रत्यक्षात साकारली. या अंतर्गत मांजरा नदीवर सहा व तावरजा नदीवर एक असे एकूण सात बॅरेजेस वांजरखेडा, बोरगाव, अंजनपूर, खुलगापुर, कारसा, पोहेगाव, धनेगाव व भुसणी येथे बांधण्यात आले आहेत. मोठ्या नदीपात्रात कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून सिंचन क्षेत्रात एक नवीन लातूर पॅटर्न निर्माण केला. सिंचन क्षेत्रातील हा अभिनव प्रयोग देशभराच्या सिंचन योजनांसाठी मार्गदर्शक ठरला आहे. कृषिप्रधान असलेल्या लातूरसाठी हा पिढ्यांनपिढ्यांसाठी वरदान ठरलेला निर्णय आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील ही जलक्रांती विलासरावांच्या कतृत्वाची किमया आहे.

लातूर जिल्हा निर्मिती झाल्यानंतर आजपर्यंतचा इतिहास पाहता लातूरचा जो सर्वांगीण विकास झाला आहे. यामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचे मोठे योगदान आहे. लातूर जिल्हा निर्माण झाला तेव्हा दारिद्र्य, बेरोजगारी, अज्ञान, अंधश्रद्धा आणि मागासलेपणाच्या गोष्टी चर्चिल्या जात. हा सगळा  कलंक पुसून विकसित आणि प्रगतीच्या वाटेवर सर्वच क्षेत्रात गरुड भरारी घेत असलेले लातूर निर्माण झालेल आपण पाहतोय. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वामुळे हे घडल. त्यांनी पिढ्यानपिढ्यासाठी उपयुक्त असं केलेलं हे कार्य आहे. यामुळे येणाऱ्या पिढ्या देखील त्यांच्या निश्चित ऋणी आहेत.

विलासराव देशमुख यांच्या नवव्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूया.

मागासलेला कलंक कपाळीचा पुसण्यासाठी

सहकारातून समृध्दीची केली ‘क्रांती’.

पिढयांपिढयांचा दुष्काळ शाप घालविण्या

बॅरेजेस बांधुनी साधली ‘जलक्रांती’.

राहूल हरिभाऊ इंगळे पाटील

रा.करकट्टा ता.जि.लातूर

मो. ९८९०५७७१२८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here