विवेक भावसार

मुंबई
गंडा-दोरा बांधणे, साधू, महाराज यांचे सल्ले घेणे हे जसे सामान्य नागरिक करतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याही पेक्षा जास्त विश्वास राजकीय मंडळी ठेवत असतात. महाराज-गुरुजींला विचारून मुहूर्त काढणारे आणि मगच कार्यालय प्रवेश किंवा निवडणूक अर्ज दाखल करणारे अनेक राजकीय नेते आपल्या अवतीभोवती पहायला मिळतात. याला पवार कुटुंबीय अपवाद असले तरी मंत्रालयाच्या (Mantralaya) सहाव्या मजल्यावरील कोपऱ्यातील ‘ते’ कार्यालय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) स्वीकारतात का? आणि ते कार्यालय आता कोणाचा राजकीय बळी घेते हे भविष्यात निदर्शनास येईल.


जुन्या मंत्रालयाला 21 जून 2012 रोजी आग लागली त्यावेळेपर्यंत याच कार्यालयातून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार कारभार बघत असत. या आगीतून पवार यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभागातील कर्मचारी सुखरूप बाहेर आलेत, पण पवार यांचे कार्यकर्ते बाहेर पडू शकले नाहीत आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. 


यथावकाश मंत्रालयाचे नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण केलेल्या मंत्रालयातील याच कार्यालयाचा ताबा अजित पवार यांनी 24 आक्टोबर 2013 रोजी घेतला आणि कामकाजाला सुरुवात केली होती. अवघ्या वर्षभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात मतभेद झाले, राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) सरकारचा पाठिंबा काढला आणि राज्यात 28 सप्टेंबर 2014 रोजी राष्ट्रपती राजवट (President’s Rule) लागू झाली. यानंतर झालेल्या विधानसभा  निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress – NCP) सरकार गेले, भाजप-सेना (BJP – Shiv Sena) युतीचे सरकार आले आणि अजित पवार यांना विरोधी पक्षात बसावे लागले.


भारतीय जनता पक्ष- शिवसेना युती सरकारमध्ये ज्येष्ठ असलेले महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सहाव्या मजल्यावरील कोपऱ्यातील ते कार्यालय देण्यात आले. अवघ्या दीड वर्षात खडसे वादात अडकले, त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि पुढे त्यांची राजकिय कारकीर्द संपली. 
खडसे यांच्यानंतर पांडुरंग फुंडकर (Pandurang Fundkar) यांच्याकडे कृषी मंत्रालय सोपवण्यात आले आणि खडसे यांचेच कार्यालय त्यांना देण्यात आले. कृषी मंत्री म्हणून उत्तम काम करत असताना दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.

Late Pandurang Fundkar was second agricultural minister after Eknath Khadse in the Fadnavis government.

फुंडकर यांच्यानंतर कृषी विभागाचा कार्यभार डॉ अनिल बॉंडे (Dr Anil Bonde) यांच्याकडे सोपवण्यात आला. अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी मिळाला असतांना डॉ बॉंडे यांनी स्वतःची छाप सोडली आणि पुढच्या सरकारमध्ये तेच कृषी मंत्री होतील, असा विश्वास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. दुर्दैवाने ते 2019 ची निवडणूक हरले आणि पुढे त्यांचे राजकीय भवितव्य काय असेल हे आज तरी अनिश्चित दिसते आहे.

Dr Anil Bonde could serve mere three months as Agriculture minister.


अजित पवार यांनी बंडखोरी करून भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे पद असल्याने पवार यांना सहाव्या मजल्यावरील हेच कार्यालय देण्यात येईल, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास पवार हे मागच्या काही वर्षातील घटनांना अपवाद ठरतात की त्यांनाही हे कार्यालय लाभदायक ठरणार नाही, हे येणारा काळच ठरवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here