@maharashtracity

मुंबई: बोरिवली येथे भाजपच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेशी छेडछाड व मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महिलेसंदर्भांतील गंभीर प्रकरणावर भाजप (BJP) गप्प का, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या कुठे गेल्यात, त्यांची ताईगिरी कुठे गेली, त्यांचा फोन सकाळपासून बंद का, असे सवाल उपस्थित करीत भाजपवर चांगलीच तोफ डागली आहे. (BJP kept mum on rape incident in BJP office)

प्राप्त माहितीनुसार, बोरिवली येथील भाजपा नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात एका महिलेला पद देतो असे सांगून तिच्याशी छेडछाड करण्यात आली. त्या महिलेला मारहाणही करण्यात आली. आता या प्रकरणावर भाजपा गप्प का, भाजपच्या स्टंटबाजी करणाऱ्या ताई कुठे गेल्या असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी त्या महिलेने भाजपचे खासदार व आमदार यांच्याकडे लेखी पत्र पाठवून तक्रार केली. मात्र या गंभीर प्रकरणात दुर्लक्ष करण्यात आले, असे महापौरांनी म्हटले आहे.

वास्तविक, भाजप शासित राज्यातही महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार, अन्याय होण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र भाजपच्या महिला नेत्या या फक्त महाराष्ट्र, मुंबईतील प्रकरणावर बोट ठेवून त्याचे सोयीस्कर राजकारण करीत असतात.

बोरिवली येथील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात घडलेल्या गंभीर प्रकरणात भाजप पक्ष, महिला आघाडी, स्टंटबाजी करणाऱ्या चित्रा वाघ ही मंडळी गप्प का ? असा सवाल महापौरांनी उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ यांच्यावर महापौरांची आगपाखड

मुंबई, महाराष्ट्रात कुठेही महिलांवर अन्याय अत्याचार झाला की भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ या फक्त स्टंटबाजी करण्यासाठी पुढे येतात. महिलांवरील अन्यायाबाबत रडगाणे गातात.

मात्र आता बोरिवलीत महिलेबाबत गंभीर घटना घडल्यानंतर चित्रा वाघ यांचा मोबाईल सकाळपासून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. आता चित्रा वाघ कुठे आहेत, असा सवाल महापौरांनी उपस्थित केला आहे.

कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर कडक भूमिका घेतली पाहिजे. मी असते तर थोबाडच फोडून टाकलं असतं, असे महापौरांनी म्हटले आहे.

शाळांबाबत दिवाळीनंतर निर्णय

महापालिका शाळेत (BMC School) शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब, गरजू असतात व ते झोपडपट्टीत राहतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आणि परिस्थीती यांचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. मागच्या वेळी देखील सगळीकडे शाळा चालू झाल्या, पण मुंबईत शाळा सुरु झाल्या नव्हत्या, असे महापौर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here