बलिप्रतिपदे दिवशीच पुन्हा एकदा बळीराजाला पाताळात गाडले !

By Raju Shetti

@rajushetti

ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी उसाची एफआरपी (FRP of sugarcane) 14 दिवसाच्या आत विनाकपात एकरकमी द्यावी, असा कायदा असताना त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून एफआरपी वर्षभरामध्ये तुकड्या-तुकड्याने देण्याचा घाट केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घातलेला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana – SSS) त्याला विरोध केला असताना (नरेंद्र) मोदींपासून (Narendra Modi) (शरद) पवारांपर्यंत (Sharad Pawar) सगळ्याच नेत्यांना एफ आर पी चे तुकडे पाडण्याची घाई झालेली आहे.

दिनांक 19 ऑक्टोंबरच्या जयसिंगपूर येथील २० व्या ऊस परिषदेमध्ये किमान लाखभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी (sugarcane producer farmers) एकत्रित येऊन एक रकमी एफ आर पी पाहिजे असा ठराव केलेला आहे. बाळासाहेब (पाटील, सहकार मंत्री) या ठरावाचा आदर करणार आहात की नाही?

जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत एफ आर पी एक रक्कमी दिली पाहिजे हे सहकार मंत्री असून तुम्हाला कळत नाही का? सहकार मंत्री या नात्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे न्याय मिळवून देणं ही तुमची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, तुम्ही सहकारमंत्री असल्याचे विसरलात आणि सह्याद्रि कारखान्याचे चेअरमन या नात्याने तुम्ही तीन तुकड्यांमध्ये एफ आर पी देण्याचं जाहीर सूतोवाच केलं. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि हा अधिकार तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा सहकार मंत्री पद सोडा.

तुम्ही शपथ घेत असताना कायद्याप्रमाणे राज्य करण्याचे दिलेले वचन आणि घेतलेली शपथ विसरलात का? कर्नाटक (Karnataka) सीमाभागातील ८, कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 24, सांगली (Sangli) जिल्ह्यातील ३ आणि सातारा (Satara) जिल्ह्यातील २ साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे जवळपास ४०-४२ साखर कारखान्यांनी आज एक रकमी एफ आर पी देण्याचे जाहीर केले आहे.

यंदा साखरेलाही चांगला भाव आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार उघड उघड म्हणतायेत आम्ही (एक रकमी एफ आर पी) देणार आहे, पण बाळासाहेब देऊ देत नाहीत. “मग बाळासाहेब तुम्हालाच अडचण काय ? काय थोरल्या साहेबांचा आदेश आला आहे काय? “तुम्हाला सहकार मंत्री केलेले आहे आता आमचं मुकाट्याने ऐका”.

तुम्ही तुमच्या मुलाबाळांसहीत दिवाळी (Diwali) साजरी केली. शेतकऱ्यावर शिमगा करण्याची वेळ आली. ऐन दिवाळीत शेतकऱ्याची पोरं आंदोलन (protest by farmers) करत असताना तुम्हाला त्याच काही देणंघेणं नाही?

आज बलिप्रतिपदा. आमच्या शेतकऱ्यांचा राजा “बळी“ त्याचा दिवस. बटु वामनाने विश्वासघाताने बळीराजाला आज पाताळात गाडलं. त्या वेळेपासून आम्ही बळीच्या राज्याची वाट बघतोय आणि याच दिवशी तुम्ही मात्र कायदेशीररित्या उसाचा दर मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना पोलिसांकरवी भल्या पहाटे ताब्यात घेऊन त्यांना तुरुंगात डांबलं.

“व्वाह बाळासाहेब चांगलच पांग फेडलं”. याच शेतकऱ्यांनी तुम्हाला मत देऊन अनेक वेळा आमदार केलं, मंत्री केलं. त्याच्या उपकाराची अशी परतफेड कराल, असं वाटलं नव्हतं. तुमच्या या कृत्यावरून तुम्ही बटु वामनाचेच वारसदार असल्याचेच सिद्ध केले आहे.

ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी (Yashwantrao Chavan) महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) सहकार (cooperative movement) रुजवला आणि वाढवला, त्यांचेच कट्टर अनुयायी तुमचे वडील स्वर्गीय पी डी पाटील. ह्या दोघांच्या आत्म्याला स्वर्गामध्ये किती यातना होत असतील? तुमच्या मनाला काहीच कसं वाटलं नाही?

अजूनही वेळ गेलेली नाही. जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा आणि तुमच्या कारखान्याची एक रकमी एफ आर पी जाहीर करा. ते जमत नसेल तर सहकार मंत्री पदाचा राजीनामा द्या आणि घरात बसा. (Raju shetti demands resignation of cooperative minister over FRP issue.)

(लेखक राजू शेट्टी हे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here