Twitter : @maharashtracity

अमरावती: अमरावती व तिवसा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सर्वच म्हणजे 18 पैकी 18 जागांवर तर मोर्शीत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 11 जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात नेत्रदिपक विजय संपादन केल्यामुळे त्यांचे सक्षम नेतृत्व अधोरेखित झाले आहे. 

अमरावती, तिवसा व मोर्शी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार व शेतकरी प्रगती पॅनलने निवडणूक लढविली. यामध्ये तिवस्यात 18 पैकी 18 जागा महाविकास आघाडीने पटकावल्या तर पश्चिम विदर्भात प्रमुख असलेल्या अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 18 जागांवर विजयश्री खेचून आणला.

जिल्ह्यातही महाविकास आघाडीचे वर्चस्व

अमरावती, तिवसा व मोर्शी बाजार समिती सोबतच जिल्ह्यातही चांदुररेल्वे, अंजनगांव सुर्जी येथेही आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. चांदुररेल्वे येथे 18 पैकी 17 जागांवर तर अंजनगाव सुर्जीत 18 पैकी 14 जागांवर महाविकास आघाडीने विजय संपादन केल्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी जल्लोष

अमरावती, तिवसा व मोर्शी या तिनही कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने लढविली. निकालानंतर अमरावती व तिवसा बाजार समितीच्या सर्वच जागांवर घवघवीत यश संपादन केले तर मोर्शीत 18 पैकी 11 जागांवर यश संपादन केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोषाचे वातावरण होते. आज निकाल जाहिर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण निकाल जाहिर होताच कार्यकर्त्यांनी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या गणेडिवाल येथील निवासस्थानात फटाक्यांची आतशबाजी आणि गुलाल उधडत प्रचंड जल्लोष साजरा केला. 

नौटंकी नेत्यांना चपराक- आमदार ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, तिवसा, मोर्शी, चांदुररेल्वे व अंजनगांव सुर्जी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शेतकऱ्यांनी व इतर सुज्ञ मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारला स्पष्ट कौल दिला आहे, असे सांगून यशोमती ठाकूर म्हणाल्या की, राजकारणासाठी हनुमान चालिसेचा गैरवापर करणाऱ्या जिल्ह्यातील नौटंकी नेत्यांना मतदारांनी सनसनीत चपराक दिली आहे. जिल्ह्यातील शेकडो सहकारी संस्था अवसानात काढून सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा शिंदे- फडणवीस सरकारचा प्रयत्न सपशेल फसला असून आम्ही शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतो, याचाच मतदारांनीही विचार करुन ते आमच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे आहेत, असाच याचा अर्थ आहे, अशी प्रतिक्रिया आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here