@maharashtracity

भाजपच्या चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात

महाड (रायगड): महाडमधील आदिस्ते गावातील महिला सरपंचाच्या खुनाच्या घटनेवर भाजपच्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) कठोर टीका केली आहे. ठाकरे सरकारने महिलांना आरक्षण दिलं, पण संरक्षण नाही दिले. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना पोलीस आणि कायद्याचे भय राहिले नाही. त्यामुळेच महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी केला.

चित्रा वाघ यांनी आज आदिस्ते गावाला भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याच्या त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी महाड येथे शासकीय विश्रामगृह (Mahad Rest House) येथे पत्रकार परिषद घेवून सरकारवर टीकेचे लक्ष केले.

महाराष्ट्रात (Maharashtra) अशा प्रकरच्या घटना घडू नयेत म्हणून सरकार सक्रीय कधी होणार असा सवाल करून महाड तालुक्याला हादरुन सोडणाऱ्या आदिस्ते येथील महिला सरपंच मिनाक्षी खिडबीडे बलात्कार आणि खुन (Rape and murder) प्रकरणी न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.

त्यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणाची पहाणी केली. हा गुन्हा एका व्यक्तीने केलेला नसून एकापेक्षा अधिक व्यक्ती या गुन्ह्यात सामील असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. तांबडी येथील प्रकरणात देखील पोलीसांनी एक आरोपी पकडला होता. मात्र, या प्रकरणी देखील एका पेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता असल्याचे आपण बोललो होतो व तसेच झाले, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीच (Home Minister) कबुल केले की महाराष्ट्रातुन २५ हजार महिला गायब आहेत याची आठवण करून देतांना महाराष्ट्रात फास्ट ट्रॅक कोर्ट (Fast Track Court) नसल्याचा धक्कादायक खुलाचा वाघ यांनी या वेळी केला. तसेच फॉरेन्सिक लॅबची (Forensic Lab) पन्नास टक्के पदे रिक्त असून, बलात्कार प्रकरणातील पुरावे गोळा करुन जतन करण्याचे ७०० किट केंद्राने महाराष्ट्रला दिले होते त्या किटचे काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या वेळी त्यांच्यासोबत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. हेमा मानकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंजुशा कुद्रीमोती, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here