@maharashtracity
मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे (Winter Session) सूप आज वाजले. पाच दिवस चाललेल्या या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विद्यापीठ कायद्यातील बदलाच्या (Amendment in University bill) विधेयकावर रणकंदन माजले. या ‘कौरव सभेत’ आपला ‘धृतराष्ट्र’ होऊ नये यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) या अधिवेशनात उपस्थित राहिले नसावे असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (LoP Devendra Fadnavis) यांनी लगावला.
अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करतांना देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठ कायद्याची कठोर चिकित्सा केली. हे विधेयक कसे राज्यपालांच्या (Governor) अधिकाराचा संकोच करणारे आहे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
सभागृहात या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. सभागृहात या विधेयकावर सविस्तर चर्चा न होता गोंधळात ते मंजूर करण्यात आले.
यावर पत्रकारांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, की आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कौरव सभा होणार आहे, याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना असेल. असे सांगतानाच ठाकरे वगळता अन्य सत्ताधारी सदस्य आणि सभागृहातील कामकाज रेटून नेण्याच्या कृत्याला कौरव सभा अशी उपमा देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ते म्हणाले, अधिवेशनात मुख्यमंत्री येणार नाहीत हे आम्हाला माहिती होते. परंतु, शिवसेनेचे काही लोक मुख्यमंत्री अधिवेशनाला येतील, असा दावा करत होते. कदाचित त्यांना या कौरव सभेची (Kaurav) कल्पना असावी आणि त्याकाळी जशी भूमिका धृतराष्ट्र (Dhrutrashtra) यांना बजवावी लागली होती, ती वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी ते आले नसावे, असे फडणवीस म्हणाले.