@maharashtracity

वैद्यकीय पथकाने घेतला शोध,
नमुने तपासणीसाठी हिरे महाविद्यालयात

धुळे: कोरोनाचा उत्प्रेरक विषाणू ओमायक्रॉनमुळे (Omicron) सर्वत्र भीतीचे सावट असताना 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान विदेशातून तब्बल 32 नागरिक धुळे (Dhule) शहरासह जिल्ह्यात आले आहेत. त्यापैकी नऊ नागरिक हे दक्षिण अफ्रिकेतून (South Africa) आल्याची माहिती समोर आली आहे.

त्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या घशाचे नमुने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात (Hire Medical College) तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहीती महापालिकेचे आरोग्य अधिकारी महेश मोरे यांनी दिली.

तोपर्यंत सर्व नागरिकांचे घरातच विलगीकरण (home quarantine) करण्यात आले आहे.

ओमायक्रॉन विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे विदेशातून येणार्‍या प्रत्येक नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येते आहे. जिल्ह्यात 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान विदेशातून 32 नागरिक आलेत. त्यापैकी तीन नागरिक साक्री तालुक्यात, चार नागरिक शिरपूर तालुक्यात आले आहे. तर उर्वरित 25 नागरिक शहरात आले आहेत.

विदेश यात्रा करून जिल्ह्यात दाखल झालेल्या सर्व प्रवाशांची माहिती विमानतळ प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विदेशातून शहरात आलेल्या 23 नागरिकांना वैद्यकीय पथकाने शोधून काढले आहे. विशेष म्हणजे त्यांचा आरटीपीसीआर (RTPCR test) तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे. त्यांना भारतात येऊन सात दिवस झाले आहेत.

मार्गदर्शक सूचनेनुसार आठव्या दिवशी त्यांची पुन्हा तपासणी करणे गरजेचे असल्याने शहरातील 23, तर शिरपूर, साक्री तालुक्यातील सात नागरिकांचे नमुने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत.

अहवाल सकारात्मक आला तर त्यांच्या कुटुंबियांचीही तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार विदेशातून आलेल्या सर्वच नागरिकांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.

“विदेशातून आलेल्या धुळे शहरातील 23 नागरिकांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक आलेला आहे. त्याला आठ दिवस पुर्ण झाल्याने आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मंगळवारी आठव्या दिवशी पुन्हा 23 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.”

  • महेश मोरे, आरोग्य अधिकारी, महानगर पालिका, धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here