@maharashtracity

राज्यात आज एकही ओमिक्रोन रूग्ण नाही

मुंबई: राज्यात सोमवारी ३१,१११ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असताना मंगळवारी ३९,२०७ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासात राज्यात तब्बल ८ हजार ९६ नवे कोरोना रूग्ण वाढले असल्याचे समोर आले. तसेच मुंबईतही किंचित रूग्णवाढ झाली आहे.

कोरोना रुग्णसंख्या (corona patients) घटत असल्याचे म्हणत असतानाच अचानक झालेल्या रुग्णवाढीने चिंता पसरली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,८२,१२८ झाली आहे. दरम्यान, राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण (omicron patients) आढळलेला नसल्याने एका दिवसाचा दिलासा मिळाला आहे.

तसेच मंगळवारी ३८,८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६८,६८,८१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२% एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २,६७,६५९ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तर राज्यात आज ५३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९४% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२३,२०,३६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७२,८२,१२८ (१०.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,४४,९१९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ६१४९ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ६,१४९ एवढे रूग्ण आढळले. सोमवारच्या तुलनेत मुंबईतही किंचित रूग्ण वाढल्याचे स्पष्ट होत आहे. आता मुंबईत एकूण १०,११,३१४ रुग्ण आढळले. तसेच ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,४७६ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here