@maharashtracity

लेखक – योगेश बिडवई
पुस्तक परीक्षण – विवेक भावसार

कमी पाण्यावर घेतले जाणारे परंतु प्रसंगी भल्याभल्यांच्या डोळ्यांतून पाणी काढणारे कांदा हे नगदी पीक… ताटात आवर्जून लक्ष वेधणारा कांदा बाजारात मात्र जरासा दुर्लक्षितच राहिला आहे.

या महत्वाच्या आणि वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर स्थान मिळवणाऱ्या कांद्याची कथा आणि व्यथा मात्र फारशी उजेडात आली नाही. कांद्याचे भाव वाढले की सामान्यांच्या खिशाला कात्री लागते, अशी ओरड करणारे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम शेतकऱ्याला खरंच उत्पादन खर्च तरी मिळतो का? यावर फारसे भाष्य करतांना दिसत नाहित.

कांद्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील मूळ रहिवासी आणि गेली अनेक वर्षे मुंबईत दैनिक लोकमत या वृत्तपत्रात पत्रकारिता करतांना कृषी आणि विशेषतः कांदा या विषयावर लेखन करणारे योगेश बिडवई यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले संदर्भ पुस्तक म्हणजे ‘कांद्याची रडकथा, शिवार ते बाजार’.

पुण्याची युनिक फाउंडेशन यांच्या सहकार्यांने आणि त्यांनीच प्रकाशित केलेले योगेश बिडवई यांचे हे पहिलेच पुस्तक. 200 पानांच्या या पुस्तकाला पुस्तक म्हणण्याऐवजी मी त्याला संदर्भ ग्रंथ म्हणेल. अर्थात ग्रंथ खूप मोठा असतो. पण ग्रंथाचे सगळे सार योगेश बिडवई यांनी 200 पानांच्या कक्षेत बसलेले आहे. इथे त्यांची पत्रकारिता मदतीस आली असावी. पत्रकाराला मोठा विषय 300 ते 400 शब्दात बसवायचा असतो आणि असे करतांना मूळ गाभा, जे सांगायचे आहे त्या मुद्द्यांशी तडजोड न करता बातमी लिहायची असते. मला वाटते बतमीदारीचे हे कसब योगेश बिडवाई यांनी कामास आणले आहे.

कांदा हे एकच पीक घेऊन त्यावर सर्व बाजूंनी व्यापक संशोधन करण्याचा प्रयत्न म्हणून वरिष्ठ पत्रकार योगेश बिडवई यांच्या प्रस्तुत अभ्यासाकडे पाहता येईल.

कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात व आशिया खंडातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेत सतत अनिश्‍चितता का निर्माण होते, कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रश्‍न, साठवणुकीतील अडचणी, साठेबाजी आणि व्यापार्‍यांची मक्तेदारी, महिलांचे श्रम, भावातील चढउतार, हवामान बदल, शासनाची भूमिका, शिवार ते बाजारापर्यंतच्या अर्थकारणाची चर्चा लेखक करतात.

कमी पाणी व कमी कालावधीत येणारे हे पीक दुष्काळी भागात लाभकारक कसे आहे, दर स्थिर राहण्यासाठी किंमत स्थिरीकरणाचे उपाय, शीतगृह उभारण्याची गरज, कांदा उत्पादनातील नव्या संधींची मांडणी लेखकाने केली आहे.

आपल्याकडे शेतकरी फक्त शेतात राबतो. त्याला विपणन अर्थात मार्केटिंग ही कला माहीत नसते. म्हणून उत्पादन खर्च गृहीत धरतांना केवळ बी बियाणे आणि खते यांचा खर्च गृहीत धरून शेतकरी बाजारात उत्पादन विक्रीस आणतो. वास्तविक, त्याने केलेले कष्ट अर्थात मजुरी आणि मनुष्यबळ तास, शेतजमीनीचे भुई भाडे असे असंख्य अनेक खर्च उत्पादन खर्चात जमेस धरलेले नसते.

याच्या अगदी विरुद्ध बाब म्हणजे व्यापारी. तो दुकानाचे भाडे, कर्ज असेल तर व्याज, वाहतूक खर्च अशा अनेक बाबी एकत्र करून खर्च लावतो. त्यामुळे व्यापारी कायम नफा कमावतो तर शेतकरी कायम तोट्यात जातो. ही बाब योगेश बिडवई यांनी आकडेवारीसह नमूद केली आहे.

कांद्याची वाहतूक, साठवणूक आणि त्याची मर्यादा, निर्यात धोरण काय आहे आणि काय असावे, जैन इरिगेशनचा कांदा निर्जलीकरण प्रकल्प, शेतकरी कंपन्यांचा सहभाग, कोरोना काळात कांदा शेतकऱ्यांवर आलेले संकट, हवामान बदल, निमयन मुक्ती असे कितीतरी विषयांना लेखकाने हात घातला आहे.

हॉलंड सारखा छोटा देश आज भारतापेक्षा जास्त कांदा निर्यात करतो. यामागचे कारण काय, त्यांचे धोरण हे प्रकरण वाचून समजून घ्यायलाच हवे असे आहे.

राज्यातील असंख्य जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणजे कांदा पतपुरवठा कमी झाला आहे. साहजिकच छोटे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

लेखकाने हे पुस्तक लिहिण्याआधी अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला आहे. शेतकरी चळवळीचे उर्ध्वयु शरद जोशी यांच्या सोबत प्रत्येक लढयात खांद्याला खांदा लावून लढा दिलेल्या मुस्लिम समाजातील लढवय्ये दाम्पत्य असो की लासलगाव, जळगाव परिसरातील शेतकरी, दुग्ध उत्पादक शेतकरी अशा असंख्य लोकांना लेखकाने बोलते करून माहिती घेतली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचतांना कंटाळा येत नाही. हे पुस्तक म्हणजे केवळ शास्त्रीय आकडेवारी न ठरता संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरते.

कांदा कधी महाग होतो, राजकारण्यांची सत्ता घालवतो, कधी तो शेतकऱ्यांना हसवतो तर कधी कधी रडवतो. कांद्याच्या सुरस कथा आहेत. अशा या कांद्याचा शेतीपासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास समजून घेण्यासारखा आहे. कांदा महाग होतो पण त्यास कारणीभूत घटक काय आहेत? यापासून ते कांदा शेतीचे प्रश्न, पतपुरवठा, बाजार समित्या, एकरी उत्पादन खर्च, हवामानाचा या पिकावरील परिणाम, आयात निर्यात धोरणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका आदी बाबींचा ‘कांद्याची रडकथा’ पुस्तकात शिवार ते बाजार याचा आढावा घेतला आहे. त्याचसोबतच कांद्याची रंजक माहिती या पुस्तकात आहे.

म्हणूनच केवळ कृषी पत्रकारिता करणारे आणि शेतकरी, व्यापारीच नव्हे तर ज्याला ज्याला कांदा हा विषय समजून घ्यायचा असेल अशा प्रत्येकाने अगदी आमदार, खासदार यासारख्या लोकप्रतिनिधी यांनीही हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.

(या पुस्तकाचे लेखक आहेत योगेश प्रकाश बिडवई. , किंमत रु 250/-)

कांद्याची रडकथा – शिवार ते बाजार
लेखक : योगेश प्रकाश बिडवई
पाने : 200
किंमत : 250/-
प्रकाशक – द युनिक फाउंडेशन, पुणे

  • 40% सवलतीत उपलब्ध
    घरपोच सुविधेचे चार्जेस अतिरिक्त पोस्टेज चार्ज लागतील
    पुस्तक मागविण्यासाठी संपर्क :
    7775083344, 8605993344

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here