By संतोष मासोळे

@SantoshMasole

धुळे: कधीकाळी रॉकेलच्या काळ्याबाजारामुळे कुप्रसिद्ध असलेल्या धुळे जिल्ह्याने अलीकडे शेतीतून बेमालूमपणे गांजाचे पीक घेत गुन्हेगारी जगतात आपली नवी कुप्रसिद्ध मिळविली आहे.जोडीला बनावट दारू, गुटखा, जनावरांची अवैध वाहतूक आणि अन्य अवैध धंदेही असल्यानेच जणू जिल्ह्यात “क्रीम पोस्टिंग”मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांची स्पर्धा पाहायला मिळते. म्हणूनच अधूनमधून होणारी पोलिसांची कारवाई ही महिन्यातील कारवाईचे केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठीच असते. मूळ गुन्हेगारीला मूठमाती देण्यासाठी नव्हे हेही अधोरेखित झाले आहे.

खरं तर धुळे हा चार तालुक्याचाच जिल्हा. परंतू मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सुवर्ण त्रिकोणाच्या सीमा आणि दळणवळण हे जसे उद्योग, व्यवसायांसाठी फायद्याचे ठरतात, त्याहून अधिक फायदा अवैध धंद्यांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो असा आजवरचा अनुभव आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर हे दोन आदिवासी बहुल तालुके आहेत आणि या दोन्ही तालुक्यांच्या सीमा अनुक्रमे गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांना जोडणाऱ्या आहेत. नागपूर-सुरत व मुंबई-आग्रा या दोन महामार्गांसह गुजरात आणि पुढे देशभरात जोडले गेलेला लोहमार्ग धुळे जिल्ह्यातूनच गेला आहे.

सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि उरलीसुरली जंगल, झाडी व दऱ्याखोऱ्या घाट रस्ते अशा एकूणच भौगोलिक स्थितीचा अधिकाधिक फायदा गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांनी घेतला आहे. एक राज्यात गुन्हा केला की शेजारच्याच राज्यात दडून बसायला गुन्हेगारांना सोपे आहे. अशा गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी करावी लागणारी कायदेशीर कसरत आणि त्यात जाणारा वेळ हे सगळंच गुन्हेगारांच्या पथ्यावर पडते.

या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा हा जणू क्राईम हब झाल्याचे अनुभव येऊ लागले आहे. एकेकाळी रॉकेलचा काळाबाजार करणारा जिल्हा म्हणून धुळे कुप्रसिद्ध होताच.

जिल्हा परिषदेतील बहुचर्चित कोट्यवधी रुपयांचा घोटाळा हा तर देशभरात धक्का देणारा ठरला. या गुन्ह्यातील सूत्रधार भास्कर वाघ आजही जेलची हवा खातोय. गेल्या सत्तावीस वर्षांपासून या गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज सुरू आहे. यानंतर संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या मुद्रांक घोटाळ्याचेही धागेदोरे धुळ्यापर्यंत आले होते. मुद्रांक घोटाळ्यातला प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यांचे निकटचे संबंध म्हणून तत्कालीन आमदार अनिल गोटे यांना संशयित म्हणून अटक झाली होती.

गुन्हेगारीचे हे दोन मोठे उदाहरण असतांनाच जिल्ह्यात चाललेले अन्य लहानमोठे अवैध व्यवसाय जिल्ह्याची कुप्रसिद्ध अधिकच वाढवणारे ठरले आहेत. अशा अवैध धंद्यांतून केली जाणारी अमाप कमाई पुढे राजकारण हेवेदावे आणि टोळी युद्धासाठीही वापरली गेल्याची उदाहरणे आहेत. अलीकडे जिल्हा पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांच्या काही टोळी हद्दपार कराव्या लागल्या हे त्याचेच उदाहरण.

मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून बेकायदेशीरपणे वाहतूक होणारा करोडो रुपयांचा गुटखा, कत्तलीसाठी जनावरांची होणारी वाहतूक, रेशनिंगची धान्याचा काळाबाजार, बनावट दारूचे बेकायदेशीर कारखाने, रसायनांची बेकायदा वाहतूक, टनोगणती गांजाचे “उत्पादन” करून देणारी आदिवासी पहाडपट्टीतली शेती आणि अन्य गुन्हेगारी अलीकडे चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पद्मावती कापूस खरेदी विक्री केंद्र या कापसाच्या बंद जिनिंगमध्ये बनावट दारूचा कारखाना आढळून आला. मुंबईच्या भरारी पथकाने छापा घालून या ठिकाणाहून ८४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अजंदे खुर्द गाव शिवारात उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. स्थानिक अधिकाऱ्यांना या कारखान्याचा जणू मागमूसही नव्हता.अशीच कारवाई पोलिसांनी केली.

धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात तालुका पोलिसांनी संशयास्पद मालमोटारीची तपासणी केली आणि लाखो रुपये किमतीच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे उघड झाले.

याआधीही याच नागपूर-सुरत महामार्गावर पोलिसांनी अडीच कोटी रुपये किमतीचा गुटखा पकडला होता. याशिवाय मुंबई आग्रा महामार्गावर इंदूर कडून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बस मधूनही लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच शिरपूर-चोपडा मार्गावरही थाळनेर (ता.शिरपूर) पोलिसांनी एका वाहनातून २७ किलो गांजा जप्त केला. सहाययक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनी ही कारवाई केली. गांजा तस्करीचे धागेदोरे थेट मुंबई पर्यंत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा पोलिस चौकशीतून उघड झाले आहे.

शिरपुर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात गांजा या अंमली पदार्थाची अवैध शेती करण्यात येते. आदिवासी पाड्यातील तलाठी, सर्कल, तहसिलदार, प्रांत पोलीस व वन कर्मचार्यांची अभद्र टोळी येथे कार्यरत आहे.

दरमहा किमान पाच कोटी रुपयांची अधिकार्यांची चांदी सुरु आहे. पोलिसांकडून केवळ नाममात्र कारवाई केली जाते असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. नुसताच आरोप नाही तर गोटे यांनी काही पुरावेही दिले होते. यानंतर आणि या आधीही शिरपूर तालुक्यात स्वतः पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सर्च ऑपरेशन करून गांजाची शेती हुडकून काढली होती. लाखो रुपयांचा गांजा मालमोटारीत भरून पथकाने तो जप्त केला आणि गांजाचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली होती. मध्यप्रदेशच्या सीमेलगत असलेल्या कपाशीच्या शेतात एका आड एक गांज्याच्या ओळी लावन्यात आली असल्याचे गोटे यांनी सूचित केले होते हे यावेळी स्पष्ट झाले.

पीक पहाणी करण्यासाठी अथवा अन्य कारणांसाठी येणार्या तलाठी, सर्कल इन्स्पेक्टर, तहसिलदार तसेच प्रांतधिकारी यांना आपल्या भागात अमली पदार्थाच्या लागवडीची व उत्पादकांची इतंभूत माहिती आहे. गाव कोतवाल, पोलीस पाटील हेच गाव पातळीवरील सरकारी प्रतिनिधी आहेत. तेच आपल्या वरिष्ठांना माहिती पुरवित असतात असे गोटे यांचे म्हणणे होते.

आरतीसिंग या विनोदी महिला कलाकारास ८६ ग्रॅम गांजा बाळगल्याच्या आरोपावरून पोलीस कारवाईस सामोरे जावे लागले. धुळे जिल्ह्यात तर, गांजाचे उत्पादन टनाने घेतले जात आहे. त्यास जणू पोलीस सरंक्षण व शासकीय मान्यता आहे की काय असा उपरोधिक टोलाही गोटे यांनी लगावला होता. परंतु काही काळ जाताच पुन्हा या गुन्हेगारीचे डोके वर काढले आहे हे चित्र चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here