@maharashtracity

सर्वांवर मोक्कांतर्गत कारवाई करा

शिवसेनेची एसपींकडे मागणी

धुळे: धुळे महानगर पालिका (DMC) क्षेत्रातील कोविड लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा (fake covid vaccination certificate scam) दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या उपायुक्त गणेश गिरी यांना ताब्यात घ्या. त्याशिवाय पडद्यामागचे सुत्रधार बाहेर येणार नाहीत, यातील सर्वच गुन्हेगारांवर संघटीत गुन्हेगारीचे (मोक्का) (MCOCA) कलम लावावेत, अशी मागणी सोमवारी शिवसेनेने (Shiv Sena) जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे (SP) निवेदनाद्वारे केली.

यासंदर्भात शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) प्रवीण पाटील यांची भेट घेवून त्यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे महेश मिस्तरी, डॉ.तुळशीराम गावीत, किरण जोंधळे, डॉ.सुशिल महाजन, मनोज मोरे, धिरज पाटील, राजेश पटवारी, संजय वाल्हे, दिगंबर चौधरी आदी उपस्थित होते.

निवेदनात नमूद केले आहे की, लसीकरण प्रमाणपत्र घोटाळ्यात एका राजकीय पुढार्‍याच्या हस्तक्षेपामुळे पहिल्या टप्प्यात हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र मालेगाव मनपाच्या (Malegaon Municipal Corporation) पत्रामुळे या देशद्रोही कृत्याची कुजबूज सुरू झाली.

त्यामुळे सावध झालेल्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकार्‍याने संशयित लसीकरण केंद्रावरील नियुक्त कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारताच त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची लेखी कबूली दिली. तसे पत्र प्राप्त होताच आयुक्तांनी उपायुक्त गणेश गिरींना चौकशीचे आदेश दिले.

मात्र गिरी यांनी राजकीय नेत्याच्या दबावामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना ताब्यात घ्या. म्हणजे मग पडद्यामागचे सुत्रधार बाहेर येतील, असे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

लसीकरण प्रमाणपत्र घोटाळा देशद्रोह असतानाही आपल्या मर्जीतील अधिकार्‍यांसह नगरसेवकांना या प्रकरणी मुग गिळून गप्प रहाण्याचे आदेश देणारा हा राजकीय पुढारी कोण? याचा शोध घेण्याची विनंती, तसेच या सर्वांवर संघटीत गुन्हेगारी कायदा मोक्कांतर्गत कलम लावण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here