@maharashtracity

मुलुंड प्रसूतिगृह व नायर रुग्णालयात रुग्णांची हेळसांड झाल्याने गंभीर दखल

महापौरांनी घेतली आढावा बैठक

रूग्णालय, प्रसूतिगृह येथे चांगली रुग्णसेवा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार

मुंबई: मुलुंड येथील प्रसूतिगृहामध्ये महिलेचा झालेला दुर्देवी मृत्यू आणि नायर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांची झालेली हेळसांड या दोन्ही प्रकरणांची महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी गंभीर दखल घेतली आहे.

यापुढे पालिका रुग्णालये, प्रसूतिगृहे याठिकाणी डॉक्टरांअभावी रुग्णांची हेळसांड झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

मुलुंड प्रसूतिगृह (Mulund maternity hospital) व नायर रुग्णालयात (Nair Hospital) झालेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची महापौरांनी भायखळा, राणी बागेत शुक्रवारी आढावा बैठक घेतली. त्यावेळी महापौरांनी वरीलप्रमाणे रूग्णालय प्रशासनाला इशारा दिला आहे.

याप्रसंगी, उपमहापौर अँड. सुहास वाडकर, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे आणि पालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते.

Also Read: आताही डबल मास्क वापरा

काही दिवसांपूर्वी मुलुंड येथील प्रसूतिगृहामध्ये दाखल महिलेचा रुग्णसेवेत हेळसांड झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नायर रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे रुग्णांची हेळसांड झाली. दुर्दैवाने, गंभीर जखमी लहान मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना निंदनीय आहेत, असे महापौरांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

डॉक्टरांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार

डॉक्टरांविना रूग्णालय, प्रसूतिगृह चालणार नाही. रुग्णालये, प्रसूतिगृहात २४ तास डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी व डॉक्टरांच्या पगारामध्ये वाढ करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

रूग्णालय व प्रसूतिगृहामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने एखाद्या महिला रुग्णाचा जीव गेला अशा प्रकारच्या घटना यापुढे खपून घेतल्या जाणार नाहीत. जर अशा घटना पुन्हा पुन्हा घडल्या तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here