चेन्नई

मिचौंग चक्रीवादळ सोमवारी दुपारपर्यंत आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळामुळे तमिळनाडूच्या महाबलीपुरम किनाऱ्यावरील समुद्राचा स्तर तब्बल ५ फूटाने वाढला आहे.

भारतीय हवामान विभागाने तमिळनाडूच्या चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर आणि कांचीपूरममध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. व्यासरपाडी आणि बेसिन ब्रिजदरम्यानच्या १४ व्या पुलावरील पाणी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचलं आहे. चेन्नई सेंट्रलहून तब्बल ११ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे चेन्नईच्या कनाथूर भागात तुफान पावसामुळे एक भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे आणि १ गंभीर जखमी आहे.

आंध्रप्रदेशात एनटीआर जिल्ह्यात ४ आणि ५ डिसेंबर रोजी शाळा-कॉलेजांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दोन्ही राज्यात रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफच्या २१ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मिचौंग चक्रीवादळ २०२३ या वर्षात बंगालच्या उपसागरातील चौथं आणि हिंद महासागरात तयार होणारं सहावं वादळ आहे.

१०० किमी प्रति तास वाऱ्याचा वेग
बंगालच्या उपसागरावर तयार होत असलेले मिचौंग वादळ मंगळवारी आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९०-१०० किमी ते ११० किमी प्रतितास असू शकतो.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, सद्यपरिस्थितीत मिचौंग चक्रीवादळ बंगालच्या दक्षिण-पश्चिम उपसागरावर आहे. हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जात आहे. सोमवारी दुपारपर्यंत वादळ दक्षिण आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या उत्तरेकडील किनाऱ्यांहून पुढे जात पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

ओडिसातील ५ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
चक्रीवादळामुळे ओडिसात ६ डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने सोमवारी मलकानगिरी, कोरापुट, रायगडा, गजपती आणि गंजाम जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. या पाच जिल्ह्यात ५ डिसेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या काळात तुफान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here