@maharashtracity

मनपा आयुक्त टेकाळेंच्या प्राधिकृत अधिकार्‍यांना सूचना

धुळे: बनावट लसीकरण प्रमाणपत्र (Fake vaccination certificate) वाटप प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना धुळे महापालिका (Dhule Municipal Corporation – DMC) आयुक्त देवीदास टेकाळे यांनी दिल्याने आता आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नक्कीच या प्रकरणातील मुळ गुन्हेगार समोर येतील, अशी अपेक्षा धुळेकर नागरिक व्यक्त करीत आहेत.

मालेगाव मनपाने (Malegaon Municipal Corporation – MMC) धुळे मनपाकडे प्रमाणपत्रावरील बॅच क्रमांक पाठवून हे प्रमाणपत्र बनावट असल्याची शंका उपस्थित केली होती. तसेच याबाबत चौकशी करण्याच्याही सूचना केल्या होत्या. या प्रकरणाची चर्चा झाल्याने शिवसेनेने (Shiv Sena) हे प्रकरण लावून धरले.

धुळे मनपातील आरोग्य विभागाने काही लोकांना लस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र देऊन दोन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपही शिवसेनेने केला होता. तसेच या प्रकरणात दोषींविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही मनपा आयुक्त आणि पोलीस प्रशासनाकडे केली होती.

यानंतर मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत भाजपच्या (BJP) पदाधिकार्‍यांनी हाच प्रश्‍न उचलून धरत याबाबत आयुक्तांनी सभागृहात माहीती द्यावी, अशी मागणी केली होती. जोपर्यंत आयुक्त उत्तर देत नाही तोपर्यंत सभा तहकूब ठेवली होती.

त्यानुसार गुरुवारी स्थायी समितीची सभा झाली. त्यात आयुक्त देवीदास टेकाळे म्हणाले की, चौकशीअंती प्रथमदर्शनी कुणीही दोषी असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी सहायक आयुक्त नारायण सोनार यांना प्राधिकृत केले आहे. ते पोलिसात जाऊन तक्रार देतील. या प्रकरणात आता थेट गुन्हा दाखल होणार असल्याने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here