@maharashtracity

धुळे: रुग्णांसाठी आधार असलेल्या शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Hire Medical college and hospital) व सर्वोपचार रुग्णालयात सर्वत्र कचरा, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तेथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून, रुग्णांसाठी असलेले सीटी स्कॅन, सोनोग्राफी यंत्र बंद आहेत.

हे वैद्यकीय महाविद्यालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालवे, अशी मागणी करीत समाजवादी पार्टीने (protest by Samajwadi Party) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

या आंदोलनात समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल, आसिफ मन्सुरी, अकील अन्सारी, इनाम सिद्दिकी, रफिक शाह, जाकीर खान, रशीद शाह, गुड्डू काकर, गुलाम कुरेशी, इस्लाम अन्सारी, तौसिफ खाटीक, अजिज अन्सारी, इम्रान शेख, रईस अन्सारी, अमीन शाह आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

याबाबत समाजवादी पार्टीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की सद्यःस्थितीत शहरासह जिल्हाभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुणिया आदी साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शासकीय व खासगी दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल झाले आहेत.

शहरासह जिल्हाभरातील गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येतात. मात्र, महाविद्यालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. रुग्णालयातील शौैचालयांसह इतरत्र असलेल्या घाणीमुळे रुग्णांना त्यांचा वापर करणेही मुश्कील बनले आहे.

महाविद्यालयातील सोनोग्राफी (Sonography) कक्षात डॉक्टर नसल्याने तेथील ओपीडीही बंद आहे. यामुळे रुग्णांना सोनोग्राफीसाठी खासगी रुग्णालयांत 1000 ते 1500 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. महाविद्यालयातील सिटी स्कॅन (CT scan) यंत्रणाही अनेकदा बंदच असते. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.

नवीन सिटी स्कॅनचे नवे यंत्र मंजूर असून, ते त्वरित घ्यावे याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Minister Amit Deshmukh) यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नाही. या सर्व समस्यांकडे जिल्हाधिकारी शर्मा यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सपाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here