@maharashtracity
विज्ञान, कला व अध्यात्म यांचा एकत्रित संगम म्हणजे डॉ.भाऊ दाजी लाड संग्रहालय
मुंबई: विज्ञान, कला व अध्यात्म यांचा एकत्रित संगम म्हणजे भायखळा राणी बागेतील डॉ.भाऊ दाजी लाड संग्रहालय (Dr Bhau Daji Lad Museum) हे होय. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई त्याची जडण-घडण, वास्तु आणि भाषा, पेहराव याची माहिती घ्यायची असेल तर प्रत्येक मुंबईकर नागरिकाने भायखळा राणी बागेतील डॉ.भाऊ दाजी लाड संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले आहे.
महापौरांनी शनिवारी या संग्रहालयाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या व्यवस्थापकीय विश्वस्त व मानद संचालक तसनीम मेहता उपस्थित होत्या.

महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, डॉ.भाऊ दाजी लाड संग्रहालय हे जगभरातील पुरातन वास्तू संग्रहालयापैकी एक आहे. जगभरातील पुरातन वास्तू जतन समितीने पुरस्कार देऊन याची नोंद घेतली आहे, याचा मला मुंबईची महापौर म्हणून अभिमान आहे.
तसेच, ज्या देवीमुळे मुंबईला मुंबई हे नाव पडलं त्या मुंबादेवीचे शिल्प या संग्रहालयामध्ये असावे, अशी इच्छा सन २००८ साली शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार या संग्रहालयामध्ये सन २००९ मध्ये मुंबादेवीचे शिल्प बसविण्यात आल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाविषयी सविस्तर माहिती
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय १८५७ साली जनतेसाठी खुलं करण्यात आलं. मुंबई शहरातलं हे सर्वात जुनं वस्तुसंग्रहालय आहे. पूर्वाश्रमीचं व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम हे ललित आणि औद्योगिक कलावस्तुंच्या माध्यमातून मुंबईचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा मांडतं.

हा संग्रह आधुनिक कलाप्रवाहाचा प्रारंभीचा काळ तसंच मुंबई संस्थानातील विविध समुदायांनी जोपासलेली कुशल कारागिरी अधोरेखित करतो. मातीत घडवलेली लघुशिल्पं, नकाशे, पाषाणावरुन केलेली मुद्रांकनं, छायाचित्रं आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतचा मुंबई शहराचा आणि शहरवासियांचा इतिहास सांगणारी दुर्मिळ पुस्तकं यांचा येथील संग्रहात समावेश होतो.
बृह्न्मुंबई महानगरपालिकेचं (BMC) हे संग्रहालय एके काळी भग्नावस्थेकडे झुकत असताना संग्रहालयाचं पुनरुज्जीवन इन्टॅकच्या सहकार्याने पाच वर्षांच्या कालावधीत करण्यात आलं. ह्या प्रकल्पास जमनालाल बजाज प्रतिष्ठानाचं सहकार्य लाभल आहे.