@maharashtracity

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण आवश्यक

मुंबई: राज्यात मंगळवार दिनांक 1 डिसेंबर पासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर शालेय शिक्षण विभाग ठाम असून त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांचे संपूर्ण लसीकरण (vaccination of teaching staff), आरोग्य, स्वच्छता आदि सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

आदेशानुसार शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कोविड लसीकरण म्हणजे दोन डोस घेतलेले शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना शाळा कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) करणे आवश्यक असल्याचेही त्या आदेशात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना नाक व तोंड मास्कने पूर्णतः झाकण्यास सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी करणारे तसेच परस्परांना स्पर्श होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध राहणार आहेत.

शिक्षक व पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घेण्याबाबत सुचना करण्यात आली आहे. शाळेत हात धुण्याची तसेच बैठकीची व्यवस्था असावी. मात्र विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी राखून शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी.

सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे १०० टक्के लसीकरण होणे आवश्यक असल्याचे यात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here