@maharashtracity

मुंबई: राज्य शासन व मुंबई महापालिकेकडून (BMC) मच्छीमार, मच्छी विक्रेत्यांवर होत असलेला अन्याय आणि मच्छी विक्रेत्यांच्या प्रलंबित समस्या याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढून आणि जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.

या मोर्चात डहाणू, सातपाटी, उत्तन, वसई, पालघर, बोईसर, रायगड, कुलाबा, माहीम, खार दांडा, वरळी, ठाणे, भांडुप, पनवेल, नवी मुंबई इत्यादी ठिकाणाहून माजी नगरसेवक विलास चावरी, बर्नार्ड डिमेलो, संजय कोळी, नयनाताई पाटील, ॲड. कमलाकर कांडेकर, प्रदीप टपके, विनोद पाटील, शुभांगीताई कुटे, राजश्रीताई भांजी प्रफुल भोईर, जी.एस. पाटील, दिगंबर वैती, संतोष मर्दे, विश्वनाथ सालीयान, कुंदन दवणे आदी सहभागी झाले होते.

मोर्चात सामील झालेल्या शिष्टंडळाने उपआयुक्त रमेश पवार ह्यांची भेट घेतली. मच्छीमारांची क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी मंडई संदर्भातील आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या मागणीला आणि दादर येथील मासळी मंडईच्या महिलांना पुन्हा त्याच जागे पुनर्वसन करण्याच्या मागणीला वरिष्ठांकडे सोपवण्यात येईल, असे आश्वासन दिले.

त्यानंतर, मच्छीमारांच्या शिष्टमंडळबरोबर पालकमंत्री अस्लम शेख ह्यांची बैठक झाली. यावेळी, मंत्री शेख यांनी, मच्छिमारांच्या मागण्या पालिकेकडून मान्य करण्यासाठी पालिका आयुक्तांसोबत एक बैठक घेऊन समाधानकारक तोडगा काढण्यात येईल, तसेच कोळीवाड्यांना गावठाणचे आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे देवेंद्र तांडेल यांनी सांगितले.

क्रॉफर्ड मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई आणि दादर येथील सौ. मीनाताई ठाकरे मासळी मंडईवर पालिकेने कारवाई करून तेथील मच्छी विक्रेत्यांना हटवले. मात्र त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात आलेले नाही. यामागे मोठे षडयंत्र असून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही याठिकाणी मोठ्या संख्येने आलो आहोत, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी सांगितले.

राज्य शासन, मुंबई महापालिका व अन्य प्राधिकरण असोत, आमच्या मच्छी विक्रेत्यांच्या हक्काच्या जमिनी आणि मासळी मंडईतुन हटविण्यात आले असून आम्हाला आमच्या व्यवस्याच्या जागा परत करण्यात याव्यात, अशी मागणी देवेंद्र तांडेल यांनी यावेळी केली.

यासंदर्भात जर राज्य शासन व पालिका प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला अपेक्षित न्याय येत्या दहा दिवसात न दिल्यास तर पंधराव्या दिवशी आम्ही आणखीन मोठ्या संख्येने जमून अधिक उग्र आंदोलन करणार आहोत, असा इशाराही देवेंद्र तांडेल यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here