ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात

@maharashtracity

मुंबई: कोरोना विषाणू सतत रूप बदलत असल्याचे आढळून आले आहे. नवीन रूप किती प्रभावी आहे हे पाहणे गरजेचे असल्याने विषाणूचे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ (Genome Sequencing) करणे आवश्यक ठरते. आता जिनोम सिक्वेन्सिंग मुंबईतल्या मुंबईत करणे शक्य होणार आहे. त्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) हे यंत्र बसविण्यात येणार असून ४ ऑगस्टपासून संशयित नमुन्याचे तसें परीक्षण सुरु होणार असल्याची माहिती मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.

आतापर्यंत संशयित रूप बदलेल्या विषाणूचे परीक्षण पुणे येथील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजी (National Institute of Virology) या राष्ट्रीय प्रयोगशाळेत केले जात आहे. यापूर्वी देखील कोरोनाचे नमुने देखील एनआयव्ही (NIV) संस्थेतच तपासले जात होते. त्यामुळे एनआयव्हीवर कामाचा ताण येत होता.

आता देखील कोरोनाचे नवे प्रारूप तपासण्यासाठी कोरोना विषाणूचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्यामुळे राज्य सरकार व मुंबई महापालिकेने (BMC) पुणे (Pune) ऐवजी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातच या कोरोनाचे रूप बदलणारे यंत्र सिंगापूर (Singapore) येथून आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे यंत्र आता मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे.

वास्तविक, हे यंत्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईत दाखल होणार होते. मात्र परदेशातून कार्गो सर्व्हिसची परवानगी प्रक्रिया विलंबाने झाल्याने यंत्र राखडले होते. आता मुंबई विमानतळावरील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ते पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आणण्यात येणार आहे. दोन ते तीन दिवस त्याची ट्रायल केल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईतच ‘जिनोमिक सिक्वेन्सिंग’चा वापर करून चाचण्या केल्या जातील, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here