By Vijay Sakhalkar
@maharashtracity
लोकनायक जयप्रकाश नारायण (Lok Nayak Jayaprakash Narayan – JP) यांच्यासमोर तस्करीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मस्तान याने सामाजिक कार्यास सुरुवात केली. विविध दर्ग्यावर जाऊन दर्शन घेतानाच या दर्ग्यांतील महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या वेळी नियाजमध्ये सहभाग देण्याचा मानही तो पटकावत राहिला.
त्याच सुमारास त्याची दूरदर्शनवर (Doordarshan) एक मुलाखतही घेतली गेली. तो समग्र वृत्तपत्रसृष्टीस (media) एक धक्काच होता. मराठी वृत्तपत्रांतून त्याच्या या सन्मानाची रेवडी उडवली गेली. मस्तान (Haji Mastan) काय सांगणार याच्या कुतूहलापोटी लोकांनी ही मुलाखत आवर्जून पाहिली. पण मुलाखतीत म्हणावा तसा दम नव्हता.
मस्तान तस्करीतील (smuggling) दुवे कथन करील, तस्करी करतावेळी आलेल्या अनुभवांचे कथन करील, अशी अपेक्षा मात्र फोल ठरली. मस्तान हातचं राखूनच बोलला आणि कुणाचीही नावं त्यानं फोडली नाहीत. तस्करी ही देशात समांतर अर्थव्यवस्था (Parallel economy) आणते म्हणून जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनाला आपण प्रतिसाद दिला व तस्करी सोडली असे सांगितले. टाळ्यांचा गजर इतकीच या मुलाखतीची संभावना करता येईल.
वस्तुत: तस्करी बंद पडली नव्हती. फक्त सोन्याची तस्करी (Gold smuggling) बंद होती. कारण सरकारच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील अंतर्गत बाजार यातील सोन्याच्या दरांची तफावत फक्त तीस रुपयांवर आली होती. परिणामी तीस रुपयांच्या गाळ्यात अन्य गोष्टी बसवून फायदा मिळवणं कठीण बनलं होतं.
सोन्याची तस्करी बंद पडली तरी तस्करांनी नवी क्लृप्ती शोधली होती. परदेशी बनावटीचं कापड, इलेक्ट्राॅनिक वस्तू (electronic items), टीव्ही (Television), टेपरेकाॅर्डर (Tape recorder), एसी (Air conditioners) आणि तत्सम वस्तू तस्करीतून येत असत. पण सोने तस्करीची मजा त्यात नव्हती. बडे तस्कर ‘शेर बूढा हुवा तो भी घास खाता नही’ असं म्हणत या तस्करीपासून दूर राहिले.
मस्तान फिल्म फायनान्स (Bollywood financer) करीतच होता. त्याच्या जोडीला भवन निर्माता (Builder developer) म्हणूनही स्थिरावला होता. सोने तस्करीतील अनेकांनी या व्यवसायात पदार्पण केले होते. त्यामागे एक फार मोठे आर्थिक फायद्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि तो अर्थ तज्ज्ञांनी काढला होता.
मस्ताननं मुंबईतील सर्व छोट्या मोठ्या टोळ्या हाताशी धरल्या होत्या. केवळ त्याचा तस्करी माल विनासायास इकडून तिकडे सुरक्षित नेता यावा यासाठी. त्या टोळीनायकांना दरमहा वेतन देणं आणि सांभाळणं महत्वाचं होतं. शिवाय मुबईत कुणाशीही नाळ बांधलेली नसणाऱ्या अनेक नव्या भाईंची गल्लोगल्ली पैदास झाली होती.
प्रसिद्धीसाठी ती मंडळी काही करायला तयार होती. वरधराज मुदलीयार (Varadarajan alias Vardhabhai Mudaliar) याची टोळी फुटली होती. सोमा आणि दर्शनसिंग टिल्लू वेगळे झाले होते. राजन नायर (Rajan Nair), फिलिप पांढरे, अरुण गवळी (Arun Gawli), रमा नाईक (Rama Nayak), बाबू रेशीम, समदखान (करीम लालाचा पुतण्या) आदी नव्या भाईंची गुंडागर्दी सुरू होती.
१९८४ साली मुंबईला फार मोठ्या दंगलीला सामोरे जावे लागले. त्या काळात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त झाला होता. पोलिसांनी हा साठा करणारे म्हणून करीम लाला (Karim Lala) व हाजी मस्तान यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.
या वातावरणात हाजी मस्तान राजकीय पाठबळ (Political backing) शोधण्याच्या प्रयत्नात होता. पण उघड उघड त्याला पाठबळ देण्यासाठी कुठलाच राजकीय पक्ष तयार नव्हता. त्या काळात आंबेडकरी विचार पुढे नेणारा जोगिंदर कवाडे (Prof Jogendra Kawade) याच्याशी त्याची ओळख झाली व दलित मुस्लिम सुरक्षा सहासंघाची (Dalit-Muslim-Minority Suraksha Mahasangh) स्थापना झाली.
नेमकी याच सुमारास मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (BMC election) घोषित झाली. त्या निवडणुकीत दलित मुस्लिम सुरक्षा महासंघाचे चाळीस एक उमेदवार उभे होते. हवा त्यांची झाली होती. मुस्लिम आणि दलितांची एकगठ्ठा मतं या आघाडीला पडतील कसा अंदाज व्यक्त केला जात होता. पण खाजगीत बोलताना निवडणुकांचा दीर्घ अनुभव असणारे पत्रपंडित ही युती फारशी मतं मिळवेल असं वाटत नाही, असं मतही व्यक्त करीत होते.
प्रचाराची राळ उठली. मुंबईतील झोपडपट्ट्या (slum), दलित वस्त्या आणि मुस्लिम बाहुल्य भागात या महासंघाचा चांगल्यापैकी प्रचार सुरू होता. अर्थात बाजी मारली शिवसेनेनेच (Shiv Sena). पण दलित मुस्लिम सुरक्षा महासंघानं मिळवलेली मते दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती. ब-यापैकी मते या आघाडीनं मिळ्वली.
महासंघाचे मुंबईत ऑफिस होतं आणि तिथं निवडणूक संपल्यानंतरही चांगली गर्दी जमत होती. कार्यकर्ते मंडळी हजर असत. लोकांची कामेही होत असत.
कालांतराने दलित मुस्लिम सुरक्षा महासंघाचा प्रभाव ओसरला. या राजकीय पक्षाबद्दल किंवा आघाडीबद्दल बरंच काही बोललं जाई. काही लोकांच्या मते शिवसेनेची मते फोडण्यासाठी काॅंग्रेसमधील (Congress) कुण्या नेत्यानं मस्तानला त्यासाठी भरीस पाडल्याचं म्हटलं गेलं. पण तसा आधार कुठे सापडत नाही. मस्तानला खरोखरीच राजकीय कारकीर्द हवी होती.
(लेखक विजय साखळकर ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)