@maharashtracity

राज्यात ओमिक्रोन संसर्गाची चिंता वाढली

मुंबई: राज्यात डोंबिवली (Dombivli) शहरापाठोपाठ पुण्यात (Pune) एकाच दिवशी ७ कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल ओमिक्रॉन विषाणू पॉझिटिव्ह (Omicron positive) आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) सहाजण तर पुण्यात एकाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा असल्याची माहिती आरोग्य विभागाने रविवारी दिली. यात दीड आणि सात वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. आता राज्यातील ओमिक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

पिंपरी चिंचवडमधील सहा रुग्णांपैकी तीनजण नायजेरिया (Nigeria) देशातील लेगॉस (Lagos) शहरातून आले होते. २४ नोव्हेंबर रोजी ४४ वर्षीय भारतीय वंशाची महिला महिला आपल्या दोन मुलींसह पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या भावाला भेटायला आली होती.

या महिलेसह तिच्या दोन मुलींना, महिलेच्या भावाला आणि भावाच्या दोन मुलींच्याही स्वॅबनमुन्यांमध्ये ओमिक्रॉन बाधा असल्याची माहिती पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान विषाणू (NIV) संस्थेनं रविवारी संध्याकाळी दिली. तिला आणि तिच्या दोन्ही मुलींना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील १३ जणांची आरोग्य विभागाने कोरोनाची तपासणी केली. त्यावेळी तिच्या ४५ वर्षीय भावाला तसेच दीड आणि सात वर्षाच्या मुलीमध्येही ओमायक्रॉनचा विषाणू आढळून आला.

नायजेरियातून आलेल्या महिलेच्या आजाराची लक्षणे सौम्य असून, इतर पाचजणांना कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. या सहा जणांपैकी तिघे १८ वर्षांखालील असून, त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यापैकी दोघांनी कोविडशिल्ड (Covishield) तर एकानं कोव्हॅक्सिन (Covaxin) घेतली आहे.

या सहा रुग्णांवर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयावर उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर पुण्यात आढळलेल्या सातव्या रुग्णाने १८ ते २५ नोव्हेंबर या काळात फिनलंडचा (Finland) प्रवास केला असल्याचे सांगण्यात आले. २९ नोव्हेंबर रोजी त्याला ताप आल्याने चाचणी केली असता तो कोविड पॉझिटिव्ह आढळला. त्याने कोविडशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून त्याचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

रविवारपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर (Nagpur) आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिजोखमीच्या देशातून ४ हजार ९० तर इतर देशातून २३ हजार ३२० असे एकूण २८ हजार २२ प्रवासी आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here