मुंबई: महा आवास (ग्रामीण) अभियानांतर्गत बांधलेल्या घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देऊन ई गृह प्रवेशाचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला
मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या तर याचवेळी ई गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चाव्यांचे वितरण करण्यात आले.
कोरोना काळात घर महत्वाचे
मागील दीड वर्षापासून राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना आपण नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत होतो. परंतू घर नसलेल्यांनी घरात कसे राहायचे, भुमिहीनांनी घरात सुरक्षित कसे राहायचे हा प्रश्न होता, ज्याचे उत्तर आज ग्रामविकास विभागाने दिले असून विक्रमी १०० दिवसात 8 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट विभागाने निश्चित केले होते.
त्यातील ३ लाख २२ हजारांहून अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली ज्याच्या चाव्या आज आपण लाभार्थ्यांना देत आहोत तर उर्वरित4 लाख 67 हजार 953 घरांचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासन अनेक योजना राबवते, त्यात अनेक योजना केवळ जाहीर होतात पण ग्रामविकास विभागाने जलदगतीने घरं बांधून गोरगरीबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्याबद्दल मी यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.
३ लाख २२ हजार ९२९ घरकुलात राहणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर आज १५ लाख लोकांच्या डोक्यावर महाआवास अभियानातील घरकुलांनी छत उपलब्ध करून दिले आहे, त्यांना सुरक्षित केले आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अभियानात गवंडी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल विभागाचे कौतूक करून मुख्यमंत्री म्हणाले की, घरांच्या बांधणीसाठी लागणारे साहित्य महिला बचतगटांच्या “घरकुल मार्ट”मधून उपलब्ध करून देऊन त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम ही विभागाने केले आहे. हे सर्वसामान्य जतनेचे स्वप्नं पूर्ण करणारे शासन आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अभियानाची वैशिष्ट्ये
· मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या देण्यात आल्या. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
· अभियानामुळे सर्वसामान्यांसाठी सर्व सोयींनीयुक्त 3 लाख 22 हजार 929 घरकुले पूर्ण झाली. आज या सर्व लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चावीचे वितरण करण्यात आले
· 4 लाख 67 हजार 953 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
· घरासाठी आर्थिक सहाय्य देण्याबरोबर भूमिहीन लाभार्थ्यांना विविध योजनेतून घरकुल उभारणीसाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दिल्या. या लाभार्थ्यांची संख्या ५० हजार ११२
· वाळूसहीत इतर बांधकाम साहित्याची उपलब्धता केल्याने अभियान कालावधीत घरांची उभारणी वेगाने होऊ शकली.
· महिला बचत गटाच्या सहकार्याने लाभार्थ्यांना वाजवी दरात बांधकाम साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी ६१२ “घरकुल मार्ट” उभारण्यात आले.
· गवंडी प्रशिक्षाणवर भर दिला. आतापर्यंत ८ हजार ८१५ गवंड्यांचे प्रशिक्षण पूर्ण तर १३ हजार २९५ गवड्यांचे प्रशिक्षण प्रगतीपथावर
· घरकुल लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अभियानात प्रयत्न करण्यात आले. यासाठी विविध विभागांच्या योजनांचा कृतीसंगम करण्यात आले.
· जागेची अडचण असलेल्या ठिकाणी १२८६ बहुमजली इमारती बांधण्यात आल्या
· जागा आहे तिथे ६२५ गृहसंकुल उभे केले
· अनुदानाव्यतिरिक्त घरबांधणीसाठी अधिकची रक्कम ४२ हजार १८० लाभार्थ्यांना बँकाकडून गृहकर्ज मिळवून देण्याची व्यवस्था
· महाआवास अभियान यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
· महा आवास अभियान दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले
· महाआवास अभियान संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
· महा आवास अभियान ग्रामीण ची माहिती देणारे सादरीकरण यावेळी करण्यात आले