@maharashtracity

By  विजय साखळकरमुंबई

करीमलाला आणि रहीमलाला यांनी पठाण टोळी चालवत असतांना आपली राजकीय पाळेमुळेही घट्ट रुजवली. त्या काळात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. सरहद्द गांधींना पठाणी (Pathan) माणसं मानत होती. त्यांचे समर्थक म्हणून पठाणांनी चळवळीत सहभाग घेतला होता. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर करीमलाला (Kareem Lala) नकळत राजकीय विचारधारेत गुंतून गेला. कसा ते कळणार नाही पण ज्याने १९८३ सालचा ‘भ्रमंती ‘ हा प्रमोद नवलकर (Pramod Navalkar) यांचा दिवाळी अंक पाहिलाय त्याला करीमलालाचा थेट पंतप्रधानांसोबतचा  फोटो पाहायला मिळाला आहे. स. का. पाटील यांचा मुंबई काँग्रेसमध्ये (Mumbai Congress) दबदबा होता. करीमलालाचे त्यांच्याबरोबरचेही फोटो वेगवेगळ्या  नियतकालिकांतून पाहायला मिळतील.

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) निवडणूक करीमलालाच्या समर्थकांच्या मदतीनं जिंकता येतात असं त्या काळात मानलं जाई. अपवाद फक्त १९६७ ची निवडणूक. त्यावेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मुद्यावर लढवली गेली. स का पाटील यांना तुम्ही पाडू शकता ही कॅचलाईन आचार्य अत्रे यांनी दिली होती आणि स. का. पाटलांना त्यावेळी दुर्बुद्धी सुचली….. यावच्चंद्र दिवाकरौ….  मुंबई तुम्हाला मिळणार नाही अशी दर्पोक्ती मारली होती. ‘सकां’ना त्यावेळी मुबईकरांनी अस्मान दाखवले.

सांगायचा मुद्दा हा की करीमलाला याची राजकीय बांधीलकी त्यावेळी काॅंग्रेस पक्षाशी होती. पण कदाचित ती काँग्रेस सत्ताधारी पक्ष असल्यानेही असू शकेल. नंतरच्या काळात त्याचा इतर राजकीय पक्षांशी खटका उडाल्याचे प्रसंग बातम्यांतून दिसले नाहीत. एक गोष्ट मात्र सामाजिकदृष्ट्या खटकणारी वाटली. एरवी पठाणांसोबतच टोळीत हिंदू सदस्यांनाही समान वागणूक देणारा करीम लाला पोलिसांच्या राडारवर आला होता….. दंगलीसंबंधात…. १९८४ साली…. एका गोदामात सापडलेल्या दंगलीस उपयुक्त सामग्री ठेवण्यात अन्य दोन व्यक्तींसमवेत करीमलालाविरोधात गुन्हा नोंदवला गेला होता.

करीम लाला भाडोत्री मारेकरी पुरवत असायचा.  युसूफ पटेलवरील गोळीबारातून ही बाब उघड झाली. त्यानं शहरभर त्याच्या टोळीचे पंख पसरले होते व पुढे त्या पंखाखाली त्यानं मुंबईतील सर्व गुंड टोळ्या सामावून घेतल्या. अर्थात ही सर्व कारागिरी त्यानं हाजी मस्तान मिर्झा याच्या आराखड्यानुसार पार पाडली. १९७१ पासून वर्धराज मुदलियारही सामील झाला. मुंबईचं त्या काळातील हे अत्यंत स्ट्राॅंग सिंडिकेट. करीमलाला जागा खाली करून घेण्याचा व्यवसाय करायचा. ज्या जमिनीवर कब्जा करून झोपडपट्ट्या किंवा व्यावसायिक – व्यापारी  स्वरुपाची बांधकामं उभी आहेत तिथं रोकड स्वीकारून ती जमीन बांधकाममुक्त करण्याचा व्यवसायही तो करीत असे.

करीमलालाचा अंमली पदार्थांच्या व्यापाराशी आणि तस्करीशी नेमका संबंध किती, हे तपासून घ्यावे लागेल. कारण करीम लालाचे काही मित्र अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित होते. पण करीम लालाचा थेट संबंध आढळून येत नाही. अर्थातच अंमली पदार्थांची अमेरिका आणि अन्य प्रागतिक देशात होणारी निर्यात अफगाणिस्तानातून (Afghanistan) होत असे व तेथे करीम लालाचे जिव्हाळ्याचे संबध होते.

करीमलालाला मुलगा नव्हता. रहिमलालाच्या दोन मुलांना त्यानं आपले वारस मानले होते. समद खान आणि मलद खान. पण ते अकारण ताज्या दमाच्या गुंडांच्या साठमारीत ओढले गेले आणि त्यांचा अकाली अंत झाला. पुढे रहिमलालाही प्रतिस्पर्धी टोळीकडून मारला गेला.
आपल्या अंतकालात करीम लाला ग्रॅंटरोड परिसरात राहत होता. तिथं त्याची मुलाखत पिंकी विराणी हिनं घेतली होती. करीमलाला त्या काळात सर्वस्व हरला होता. तो आणि त्याची पत्नी तिथ राहत होते. पण बाकी सा-यांच्या अर्थात गुन्हेगारीशी (underworld) संबंधित टोळ्यांच्या नायकांच्या घराबाहेर असायची तशी कडेकोट सिक्युरिटी त्याच्या घराबाहेर नव्हती. हे तिनं लिहिलं होतं. पण त्या वाक्याचे दोन अर्थ निघतात.
एक म्हणजे…. तो कुणालाही विशेषत: त्याच्या टोळीशी उभा दावा मांडणा-या टोळ्यांना आणि टोळीनायकांना आपल्या एखाद्या पंचने करारा झटका देऊ शकत नव्हता. निरुपद्रवी असल्यानं त्याला त्यांनी तसाच फ्रेममध्ये ठेवला.

किंवा दुसरी बाब म्हणजे त्याचा उंच बांधा, धडधाकट शरीर, भेदक डोळे….. दृष्टी अधु झाली असली तरी डोळे आरपार पाहत असल्यासारखे वाटायचे. शिवाय निवृत्त असला तरी दरारा कायम होता. सिक्युरिटी कव्हर कशा रीतीनं ठेवलं असेल याविषयीची अनभिज्ञता….
संपूर्ण मुंबई शहर आपल्या इशा-यावर नाचवणारा करीम लाला या मुलाखतीत त्याच्या काळातला खूनखराबा आणि आजच्या काळातील खूनखराबा यावरही या मुलाखतीत भरभरून बोलला आहे. त्या काळात शब्दावर किती भर असायचा आणि शब्द फिरवला का जात नसे यावरही तो खूप बोलल आहे. मात्र प्रत्येक‌ वाक्यानंतर तो  ‘वाच्यता होऊ नये आणि पोलिसांचा ससेमिरा लागणार नाही याची काळजी घेताना दिसत होता. हा सर्व भाग पुढील अंकात….(पुढील अंकी)

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वृत्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here