@maharashtracity

तीन महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ देण्याची मागणी

धुळे: नाशिक येथील खासगी ठेकेदार दिग्विजय एंटरप्रायझेसचे कामगार येथील महापालिकेच्या हिवताप विभागात (Malaria department) कार्यरत आहेत. या कामगारांचे नोव्हेंबरपासूनचे तीन महिन्यांचे वेतन थकल्याने सोमवारी या कामगारांनी धुळे महापालिका कार्यालयात निदर्शने करुन थकीत वेतन देण्याची मागणी केली.

या आंदोलनात महेश भवरे, शेखर पवार, योगेश शिंदे, आनंद साळवे, करण परदेशी, हरीश वराडे, प्रशांत कोळवले, जितेंद्र वाघ, निलेख परदेशी, ज्ञानेश्‍वर बैसाणे, सुदर्शन खैरनार, प्रफुल्ल वाघ, राहुल काकडे, मयूर आव्हाड, कपिल काळे, वैभव चौधरी, राहुल सोनवणे, बाबू बारी, लोकेश सैंदाणे सहभागी झाले होते.

याबाबत कामगारांनी धुळे महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation – DMC) आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की आम्ही नाशिक (Nashik) येथील दिग्विजय एंटरप्रायझेसतर्फे येथील महापालिकेच्या हिवताप विभागात कार्यारत आहोत. आम्ही सर्व कर्मचारी डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुणिया, करोना आदी नैसर्गिक आपत्तींमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहोत. मात्र, आम्हाला नोव्हेंबर 2021 पासून जानेवारी 2022 पर्यंतचे तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.

यामुळे आमच्यासह कुटुंबांची उपासमार होत आहे. तसेच आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. वेतन नसल्याने आम्हाला कोणी उधारीवर साहित्यही देत नाहीत. तसेच मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या संगोपनाचा खर्चही उचलता येत नाही.

या पार्श्‍वभूमीवर आमचे तीन महिन्यांचे थकलेले वेतन त्वरित अदा करावे, आमची उपासमार थांबवावी. थकीत वेतन देण्यासाठी दिग्विजय एंटरप्रायझेसची समन्वय साधून लवकरात लवकर कार्यवाही करावी. थकीत वेतन त्वरित न मिळाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यासह कामही बंद केले जाईल, असा इशाराही कर्मचार्‍यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here