@maharashtracity
जनुकीय चाचणीसाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत
धुळे: इंग्लंडहून (UK) भारतात व विमानतळावरुन धुळ्यात (Dhule) आलेल्या एका महिला डॉक्टरचा कोरोना अहवाल (corona test) सकारात्मक आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे 12 दिवसांनी हा अहवाल पुनर्तपासणी केल्यानंतर सकारात्मक आला. त्यामुळे या महिलेची ओमायक्रॉनच्या अनुषंगाने जनुकीय चाचणी (Genome sequencing) करण्यात येणार आहे. त्याकरीता त्या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाने दिली.
मूळ धुळे शहरातील माहेर असलेली महिला डॉक्टर इंग्लंड येथे वास्तव्यास आहे. त्या दि. 29 नोव्हेंबरला धुळ्यात आल्या. यानंतर 7 तारखेला त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. त्यावेळी त्यांचा चाचणी अहवाल नकारात्मक आला होता.
परंतू, काही दिवसांपूर्वी डॉक्टर महिलेला लक्षणे आढळल्याने त्यांनी पुन्हा दोन दिवसांपूर्वी 13 तारखेला खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. मात्र, त्यांची प्रकृति चांगली असून त्यांनी कोरोना लशीचे दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत, अशी माहीती आरोग्य विभागाने दिली आहे.
विदेशातून आलेल्या 146 पैकी 37 नागरिकांचा शोध
धुळे मनपा हद्दीत 89, साक्रीत 22, शिंदखेडा 13, शिरपूर 15, धुळे तालुका 07 असे एकूण 146 नागरिक धुळे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यापैकी 109 नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यातील इंग्लंडहून आलेल्या 38 वर्षीय एका महिला डॉक्टरचा अहवाल सकारात्मक आला आहे. तर 146 नागरिकांपैंकी 37 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांनी चुकीचा पत्ता दिला असल्यामुळे किंवा काही तांत्रिक बाबींमुळे हे नागरिक शोधण्यात प्रशासनाला अडचणी येत आहे.