Twitter : @milindmane70
महाड
शाळेपासून प्राथमिक शिक्षण चालू होते आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया ठरते. आयुष्याची जडणघडण येथेच होते, तसेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाची ती पहिली पायरी असते. परंतु याला अपवाद ठरली आहे ती रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या गोमेंढी येथील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. या शाळेतील विद्युत बिल थकल्यामुळे विद्यार्थी अंधारात शिक्षण घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गोमेंढी गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून या शाळेत एक शिक्षक व तीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केवळ 6870 रुपयांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने शाळेची वीज जोडणी खंडित केली आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या महाड तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून संबोधले जाणाऱ्या गोमेंढी गावातील या शाळेला 10.01.2023 रोजी 6870 रुपयांचे विद्युत बिल आले होते. मात्र शाळेने वेळोवेळी कळवूनदेखील महाड येथील शिक्षण खात्याने तसेच महाड पंचायत समितीने कोणतीही दखल न घेतल्याने वीज वितरण कंपनीने थकीत बिलापोटी शाळेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
शाळेचा विद्युत पुरवठा खंडित केल्याबाबत शाळेच्या शिक्षकांनी गावच्या सरपंच सेजल कासारे तसेच उपसरपंच सरिता गोठल व ग्रामसेवक भस्मे यांनी शाळेचे थकीत विद्युत बिलाचे पैसे ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातून भरावे, अशी मागणी केली. त्यासोबत गावातील ग्रामस्थांनीदेखील शाळेचे थकीत बिल ग्रामपंचायतीने अदा करावे, अशी ग्रामपंचायतीकडे मागणी केली. मात्र ग्रामस्थांना व शाळेतील शिक्षकांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम गोमेंडी ग्रामपंचायतने केले.
सध्या पावसाळा संपून हिवाळा सुरू होत असला तरी देखील वाढत्या उष्णतेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत बसणे अशक्य झाले आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उकाड्यामुळे शाळेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वतःच्या हाताने हवा घालावी लागत आहे. या प्रचंड उकाड्यामुळे शाळेतील विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
महाड तालुक्यातील सर्वच पक्षाचे पुढारी दहीहंडी, गणपती ,दसरा, दिवाळी यासारख्या सणांवर करोडो रुपये खर्च करतात. मोठ-मोठ्या आलिशान गाड्यांमध्ये फिरतात, मात्र गोमेंढी सारख्या दुर्गम भागातील शाळेचे विजेचे बिल केवळ नाममात्र 6870 रुपये आहे, ते भरण्याबाबत महाड तालुक्यातील कोणत्या लोकप्रतिनिधीला सोयरसुतक पडले नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळांची अशीच दुरावस्था असून गोमेंढीसारख्या दुर्गम भागातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य केवळ शाळेतील विद्युत बिल थकल्यामुळे अंधारात असल्याचे उघड झाले आहे.