@maharashtracity

२० ऑगस्ट : जागतिक डास दिन विशेष

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) कीटकनाशक विभागाने सतर्कता दाखवून मलेरिया (Malaria) व डेंग्यूचा (Dengu) आजार वाढीस लागण्यास हातभार लावणाऱ्या डासांच्या अड्डयांचा शोध घेऊन जानेवारी ते ऑगस्ट मध्य या कालावधीत ३९,४८१ ठिकाणी भेटी दिल्या. तसेच डेंग्यू डासांच्या अळ्या आणि ७,९२२ ठिकाणी मलेरिया वाहक डासांच्या अळ्या नष्ट करून मुंबईकरांचा या घातक आजारांपासून मोठा बचाव केला आहे.

यासंदर्भातील माहिती कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने पालिका कीटकनाशक विभागाकडून डेंग्यू, मलेरिया यांच्या उत्पत्तीला कारणीभूत अळ्यांचा घरोघरी भेटी देऊन शोध घेण्यात येऊन त्या अळ्या नष्ट करण्यात येतात.

विशेष म्हणजे गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही कठीण परिस्थितीतही कीटकनाशक विभागातील १ हजार ५०० संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी, जानेवारी ते आतापर्यंतच्या साडेसात महिन्यांच्या कालावधीत ३९ हजार ४८१ ठिकाणी ‘एडिस एजिप्ती’ (Aedes aegypti) या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणा-या डासांच्या अळ्या तर ७ हजार ९२२ ठिकाणी मलेरिया वाहक ‘ऍनॉफिलीस स्टिफेन्सी’ (Anopheles stephensi) डासांच्या अळ्या नष्ट केल्या आहेत.

मुंबईच्या कानाकोपऱ्यातील विविध भागांचे व इमारतींच्या परिसरांचे सर्वेक्षण व तपासणी नियमितपणे करण्यात येत असते. या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर व त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यामधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येते.

या तपासणी दरम्यान डासांची उत्पत्ती स्थळे आढळून आल्यास ती उत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करण्यात येतात. विशेष म्हणजे कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पाळण करून कीटकनाशक विभाग कारवाई करते, असे राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here