@maharashtracity

गणेशोत्सव वा अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाऊन परतलेल्या व्यक्तींनी चाचणी करणे

मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबई: मुंबई महापालिकेने कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत तब्बल १ कोटी ५९ हजार २५४ चाचण्यांचा टप्पा पूर्ण केला आहे (Mumbai crossed 1 crore corona patient testings)

गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत मुक्काम ठोकणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप बाजारात ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी व स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेणे हाच सध्यातरी त्यावरील एकमेव उपाय आहे.

पालिका आयुक्त इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिका आरोग्य खात्यामार्फत पालिका रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्फत कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजना व वैद्यकीय उपचार पद्धती अवलंबण्यात येत आहे.

यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

मुंबईत ‘कोविड – १९’ या साथ रोगाचा पहिला रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रात मार्च २०२० मध्ये आढळून आला. तेव्हापासून महापालिकेद्वारे विविधस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांमध्ये कोरोना विषयक वैद्यकीय चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

कोविड या संसर्गजन्य रोगाची बाधा झाल्याचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. ज्यामुळे सदर बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो.

सध्या महापालिकेच्या अखत्यारीतील २६० पेक्षा अधिक चाचणी केंद्रे (नमुना संकलन केंद्रे) विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुंबई महापालिका क्षेत्रातील इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळामध्ये देखील या चाचण्या करण्यात येत आहेत.

या सर्व चाचण्यांचे निकाल हे चाचणीचा निकाल आल्यापासून २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे गरजेचे असते.

गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाऊन परतलेल्या व्यक्तींनी चाचणी करणे

कोरोनाविषयक वैद्यकीय चाचण्या या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी किंवा बाधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविड चाचणी करवून घ्यावी.

तसेच गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाऊन परतलेल्या किंवा अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाऊन परत आलेल्या व्यक्तींनी आपली कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कोरोनाची लक्षणे दिसल्यास व वेळीच निदान होऊन वेळच्या वेळी औषधोपचार मिळण्यासह संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवल्यामुळे त्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here