ताडदेव, मलबार हिल, अंधेरी, भांडुपमध्ये होणार सुविधा

@maharashtracity

मुंबई: मुबईतील वाहन पार्किंगची समस्या मार्गी लावण्यासाठी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर येथील ताडदेव, मलबार हिल, अंधेरी, भांडुप परिसरात विकेंद्रित व सर्वसमावेशक वाहनतळ व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

याअंतर्गत, ताडदेव (Tardeo), मलबार हिल (Malabar Hill), अंधेरी (प.) (Andheri) आणि भांडुप (Bhandup) परिसरात लवकरच ‘ऑनलाईन वाहनतळ आरक्षण सुविधा’ (online vehicle parking facility) प्रयोगिक तत्वावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी आवश्यक जागा त्वरित उपलब्ध होऊन वाहन चालकांना व मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू आणि मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे सल्लागार रमानाथ झा यांच्या उपस्थितीत सदर विषयावर गुरुवारी एक विशेष बैठक पार पडली.

मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहनतळ विषयक विविध बाबींची प्रभावीपणे व सुव्यवस्थितपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रात वाहन प्राधिकरणाची रचना करण्यात येत आहे. या नियोजित वाहनतळ प्राधिकरणाद्वारे प्रायोगिक स्वरूपात ‘डी’ विभाग ताडदेव, मलबार हिल येथे, ‘के /पश्चिम’ विभाग अंधेरी येथे आणि ‘एस’ विभाग भांडुप येथे अशा तीन विभागांमध्ये प्रायोगिक स्तरावर विकेंद्रित व सर्वसमावेशक वाहनात व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

याअंतर्गत प्रामुख्याने ऑनलाइन पद्धतीने वाहनतळ आरक्षण, वाहन उभे करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांचे सुव्यवस्थित नियोजन आणि शुल्क रचनेचे सुसूत्रीकरण या बाबींचा समावेश असणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या तिन्ही विभागातील परिसरांमधील उपलब्ध जागांचा अधिकाधिक परिपूर्ण वापर वाहनतळांसाठी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.‌ तसेच वाहनतळ शुल्क रचनेचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असून या विभागात सुरुवातीला ‘सी’ या वर्गवारीतील शुल्क रचना प्रस्तावित करण्यात येणार आहे.

मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत्या वाहन संख्येमुळे व वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची अडचण निर्माण होत आहे. वाहन धारक व चालक हे मिळेल त्या ठिकाणी आपल्या वाहनांची पार्किंग करतात. त्यामुळे वाहतुकीला व आपत्कालीन परिस्थिती दुर्घटना घडल्यास मदतकार्य करताना मोठी समस्या निर्माण होते. तसेच, वाहन पार्किंगसाठी वाहनतळाची समस्या बिकट होत चालली आहे.

या समस्येचे निराकरण करण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी सोयीची, सुरक्षित व परवडण्यासारखे वाहनतळ योग्य प्रकारे व विनिमयांसह उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

याच अनुषंगाने मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रासाठीचा विकास आराखडा -२०३४’ आणि संबंधित ‘विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४’ नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाहनतळ व्यवस्थापन विषयक बाबींसाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली होती.

या अंतर्गत महापालिकेच्या अधिकार क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील व रस्त्यालगतच्या वाहनतळांचे व्यवस्थापन, नियोजन आणि नियंत्रण करण्याशी संबंधित कार्ये सदर प्राधिकरणाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच या अनुषंगाने ‘अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)’ श्री. पी. वेलरासू यांची ‘वाहनतळ आयुक्त’ म्हणून यापूर्वीच नेमणूक करण्यात आली आहे.

सर्वसमावेशक वाहनतळ व्यवस्थापन

मुंबई महापालिका अधिनियमांतर्गत बृहन्मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी असणाऱ्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करणे व मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची संस्थात्मक निर्मिती करणे.
मुंबई महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील वाहनतळ व्यवस्थापन विषयक सर्वसमावेशक आराखडा तयार करणे.
वाहनतळ दर निश्चितीबाबत धोरण व अभ्यास करणे.
वाहतूक चिन्हे व फलक यासंबंधीची कार्यवाही करणे.
वाहनतळाच्या अनुषंगाने विविध स्तरीय संवाद साधणे व वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे.
वाहन व्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञान आधारित संगणकीय बाबींचा अवलंब करणे.
शहरातील शासकीय, व्यवसायिक व निवासी इमारतींमधील वाहनतळ जागांचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने ‘वाहनतळ विषयक माहितीचा साठा’ तयार करणे.
वाहन विषयक बाबींची सुयोग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने ‘वाहनतळ मार्शल’ यांची नेमणूक करण्याविषयी अभ्यास
विकास आराखड्यातील वाहनतळ आरक्षणाबाबत कार्यवाही करणे
भंगार झालेल्या किंवा वापरात नसलेल्या वाहनांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३ ठिकाणी व्यवस्था करणे.
भूमिगत वाहनतळ तसेच उड्डाणपुलाखालील जागांचा वापर याबाबत अभ्यास करणे इत्यादी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here