@maharashtracity

लसीचे दोन डोस , १४ दिवस पूर्ण केलेल्या १८ वर्षांवरील खेळाडूंना परवानगी

१८ वर्षांखालील खेळाडूंना पालकांचे संमतीपत्र, वयाच्या पुराव्याआधारे परवानगी

कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक

मुंबई: कोरोना नियंत्रणात आल्याने व तिसऱ्या लाटेची शक्यता मावळल्याने राज्य शासनाने आणखीन एक पाऊल पुढे टाकत, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरीय स्पर्धांत सहभागी असलेल्या खेळाडूंना काही अटीशर्तींच्या आधारे ७ ऑक्टोबरपासून ( पुढील आदेशापर्यंत ) ‘जलतरण तलाव’ सुरू करण्याची परवानगी दिली आहे. (State allows to open swimming pools for sportsman)

लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केलेल्या १८ वर्षांवरील खेळाडू आणि व्यवस्थापन व कर्मचारीवृंद यांना जलतरण तलावाचा वापर करण्यास, खेळाडूंना सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तर १८ वर्षांखालील खेळाडूंना त्यांच्या पालकांची संमतीपत्रे व वयाचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, आधारकार्ड अथवा वयाचा उल्लेख असलेले शाळा, कॉलेजचे ओळखपत्रे सादर केल्यास त्यांनाही जलतरण तलावात सराव करण्यास ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आलेला आहे.

मात्र शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाबाबत नियमांअन्वये, सोशल डिस्टंसिंग , मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

मात्र या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

यासंबंधित मुंबईबाबतची माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधात काहीशी शिथिलता आणून काही अतिशर्तीवर ४ ऑक्टोबर रोजी इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि त्यापाठोपाठ ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळांचे बंद दरवाजे उघडण्यास याधीच परवानगी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here