@maharashtracity

शेजारी राहणाऱ्या विवाहित तरुणाने पूर्ववैमनस्यातून खून केल्याचा संशय

महाड (रायगड): महाड तालुक्यातील आदिस्ते गावाच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांच्या खुनातील आरोपीपर्यंत पोहोचण्यात महाड तालुका पोलिसांना यश आले असून शेजारी राहणाऱ्या एका विवाहित तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्वान पथकातील श्वानाने दाखवलेल्या मार्गानुसार पोलिसांना संशयित आरोपीपर्यंत जाणे शक्य झाले. अमीर शंकर जाधव (वय ३०) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

आदिस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा दिनांक २७/ १२/ २०२१ रोजी निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली होती. महिला सरपंचाच्या खुनाच्या (murder of woman Sarpanch) घटनेने संपूर्ण महाड तालुका हादरला होता. त्यातच हि मयत महिला विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले होते.

अधिवेशन (Winter Session) सुरु असतानाच ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनानेदेखील तपासाला गती दिली. घटना घडल्यानंतर श्वान पथकाच्या (dog squad) सहाय्याने आरोपीचा माग काढणे शक्य झाले. संशयित आरोपीचे नाव अमीर शंकर जाधव असून मीनाक्षी खिडबिडे यांच्या शेजारीच राहत होता.

संशयित आरोपी जाधव याने पूर्ववैमनस्यातून क्षुल्लक कारणातून खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती महाड तालुका पोलीस (Mahad Police) उपविभागीय अधिकारी निलेश तांबे यांनी दिली. अमीर जाधव याच्याविरोधात भादवि कलम ३०२, ३७६, २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपी स्थानिक असावेत असा संशय सुरवातीपासूनच व्यक्त केला जात असल्याने आदिस्ते गावात पोलीस पथके रवाना केली होती. खुनाची घटना समोर येताच पोलीस पथकाने तत्काळ श्वान पथक मागवले होते. घटनास्थळी सुमारे चार तासातच श्वान पथक दाखल झाले होते.

श्वानपथकातील श्वानाने गावातील एका वाड्यापर्यंत जावून संशयित आरोपीचा मार्ग दाखवला होता. यातूनच या खुनाचा तपास लावणे शक्य झाले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का याबाबत तपास सुरु असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here