@maharashtracity
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (CSMT) येथे दोन वर्षांपूर्वी कोसळलेला ‘हिमालय पूल’ नव्याने उभारण्याच्या कामाला पावसामुळे विलंब होत असल्याची माहिती प्रमुख अभियंता (पूल) यांच्यामार्फत स्थायी समितीला कळविण्यात आले आहे.
या पुलाच्या नवीन बांधकामाला सुरुवात करण्यासाठी स्थायी समितीने २१ मे २०२१ रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. नियोजित कालावधीतच पूर्ण करण्यात येईल, असा दावाही करण्यात आलेला आहे.
सध्या या कोसळलेल्या पुलाचे उर्वरित बांधकाम पाडण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच टाइम्स ऑफ इंडिया कार्यालयाकडील भागात अस्तित्वात असलेल्या पुलाचे अवशेष पाडण्याचे काम जेसीबी द्वारे करण्यात आले आहे.
तर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाला लागून शिल्लक असलेल्या पुलाचे उर्वरित अवशेष पाडण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पुलाचे बांधकाम नव्याने करण्यासाठी पाईलिंगचे काम करण्यात पावसाचा अडथळा येत आहे.
या पुलाच्या दुर्घटनेप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या अभियंत्यांवर कायदेशीर खटला भरण्यात आलेला आहे. त्याबाबतची कार्यवाही पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे, असे प्रमुख अभियंता (पूल) यांच्यामार्फत स्थायी समितीला कळविण्यात आले आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक यांना जोडणारा ‘हिमालय पूल’ १४ मार्च २०१९ रोजी कोसळला . या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले होते.
मात्र तेव्हापासून ते आजपर्यंत या पुलाच्या नवीन बांधकामाला सुरुवात झालेली नाही. या पुलाच्या उभारणीच्या कामाला विलंब होत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीच्या मागील बैठकीत केला होता.
तसेच, सदर प्रकरणात दोषी असलेले अभियंते फरार असल्याचा दावाही प्रभाकर शिंदे यांनी केला होता. त्याचप्रमाणे, प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या एखाद्या प्रस्तावाला जर ३० दिवसात मंजुरी न दिल्यास सदर प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी प्राप्त होते, असे पालिका नियम सांगतो. तर मग स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या पुलाच्या कामाला ३० दिवसानंतरही सुरुवात होत नसेल, जास्त विलंब होत असेल तर त्याबाबाबत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना कोणतीही बंधने नाहीत का, असा सवालही प्रभाकर शिंदे यांनी चर्चेप्रसंगी उपस्थित करीत व जाब विचारत प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले होते.
त्यावर पालिका प्रमुख अभियंता (पूल) या खात्यामार्फत संबंधित अधिकारी यांनी स्थायी समितीला वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे.