By विजय साखळकर

@maharashtracity

त्या काळात तस्करीमध्ये काही नियम पाळले जात असत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तस्करीच्या व्यवसायात नवीन डील करतेवेळी त्या माणसाची कुणीतरी हमी घ्यावी लागत असे. ती घेतल्याशिवाय नवीन माणसाला या व्यवसायात माल उतरून घेण्यास सामील केले जात नसे.

त्या काळात जितक्या किमतीचं सोनं असे त्याच्या भारंभार चांदी द्यावी लागत असे. ही चांदी एकतर सोने पाठविणाऱ्या माणसास आधी द्यावी लागत असे किंवा सागरी मार्गात जिथं सोनं पाठविणाऱ्या तस्कराची आणि सोनं स्वीकारणाऱ्या माणसाच्या पदरी असणारी मंडळी एकमेकांना भेटत त्याच वेळी चांदी जहाजात दिली जाई व बदल्यात सोनं पुरवलं जात असे.

अशा रीतीनं व्यवहार होत असल्याने मस्ताननं हुसेन तालाच्या समक्ष गल्फमधील तस्कर सम्राटाला बजावलं.

देख बाबा…. हम पडे फटिचर आदमी. हमारे पास इतना पैसा नही है जो पुरा जहाज भरकर चांदी दे सके….लेकिन हम ऐसे भी नही है की एक बार अगर माल लिया तो गुल हो जाए… एक बार माल लिया तो आगे दुसरी बार जब माल हमरे कब्जे मे लेंगे उस वक्त पहिले टाईम का पुरा क्रेडिट चुका देंगे.

मस्तानची ही बडबड त्या मंडळींना आवडली. कारण तो बिनदिक्कत सांगत होता.

देखिये… हम कोई डील करे या ना करे इस से फर्क आप को नही पडनेवाला है| वैसे हमे भी नही पडनेवाला है| हम हमारी जगह पे खुश, आप आपकी जगहपर…..

दुबईवाली कंपनी मात्र व्यवसायाला प्राधान्य देत असल्यांंनं त्यांनी पुन्हा हुसेन ताला याला विचारलं.

इस की हमी कौन देगा….?

ताला अर्थात काही बोलायला तयार नव्हता.

दुबईवाली कंपनी माणसं पाहून आणि बिझनेसच्मा गोष्टी करुन थकली… पण त्यांना त्यांच्या मनासारखा माणूस मिळत नव्हता. त्यांच्या नेहमीच्या पध्दतीनुसार डिलींग करायला कितीतरी जणं तयार होते. पण त्यांची एक शंका होती…

समजा एक्सचेंजच्या वेळी कस्टमची धाड पडली, चांदी जप्त झाली, करायचं काय?

दुबईवाल्या कंपन्यांनी या साऱ्यांना नापसंत केले आणि आपल्या सूत्रांकडून मस्तानची अधिकाधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला.

मस्तान जिथं राहात होता तो मुसाफीरखाना भाग. नंतर त्याचा डाॅकमधील वावर, गोदी का चूहा…गोदीतील बोटींची धुराडी साफ करणारा मस्तान, अलीकडे त्यांनं राहण्यासाठी घेतलेलं घर आणि त्या आसपासची माणसं यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांना उमजलं की मस्तान अत्यंत प्रामाणिक आहे.

तरीही त्याच्यावर एकदम विश्वास टाकणं त्यांना परवडत नव्हतं. कारण सोन्याचं अख्खं जहाज केवळ क्रेडिटवर दिलं जाणार होतं. समुद्रात सोनं मस्तानच्या हवाली केलं जाणार होतं. ते उतरवून ठेवणार कुठे? मस्तानकडे अशी गुप्त गोदामे मिळू शकतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते….ज्यांची उत्तरे त्या मंडळींकडे नव्हती.

मस्तानचा तर असे दिवसात लाखोंचं घबाड जिरवण्याचा आवाकाही नव्हता. अनुभव तर शून्य. त्याचा मित्रमंडळीही अशी बडी कामं निभावण्यास शातीर वाटत नव्हती.

अखेर त्यांचा आणि हुसेन ताला यांचा पुन्हा मेळावा झाला. हुसेन ताला त्याची यंत्रणा मस्तानला देण्यास तयार होता. शिवाय तो दुबईतच कायमचा राहायला निघणार असल्यानं हमीही द्यायला तयार होता. त्यामुळे मस्तानच्या नावावर एकमत झालं. एक वेळचं क्रेडिट देण्याची तयारी तस्करीच्या इतिहासात मस्तानसाठी प्रथमच केली गेली होती.

या पद्धती़नं मस्तानची तस्करीतील कारकीर्द सुरू झाली. हुसेन ताला हमी राहिला होता. पहिली बोट आली व ठरल्याप्रमाणे दुसरी बोट येण्याच्या दिवशी समुद्रात मस्ताननं पहिल्या वेळेचं क्रेडिट चुकवलं आणि नव्या मालापैकी काही भागाचं क्रेडिट डोक्यावरून कमी केलं.

त्यामुळे मस्तानची पत वाढली. एक प्रामाणिक माणूस दिल्यानं हुसेन तालाची पत वाढली. शिवाय मुंबईच्या तस्करी इतिहासातही मस्तान मिर्झा नावाचं एक कॅरेक्टर मिळालं.

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हे विषयक घडामोडींचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here