रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते जंगी सामना पाहण्यास मिळणार!?

X : @milindmane70

मुंबई: राज्यात आधी शिवसेना पक्ष आणि नंतर शरद पवारांच्या एकसंघ राष्ट्रवादी पक्षाला देखील फुटीचे ग्रहण लागल्यानंतर रायगड जिल्ह्यातील सुनील तटकरेंच्या ताब्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला घराणेशाहीच्या विळख्यातून पवार सोडविणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे. अजित पवार गटाची रायगडातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घराणेशाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री अनंत गीते ही परंपरा खंडित करणार का? की पुन्हा सुनील तटकरे बाजी मारणार? असा प्रश्न राष्ट्रवादी गटाच्या दोन्ही बाजूकडील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना पडला आहे. घराणेशाहीच्या विळख्यातून तटकरे कुटुंबाला रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील खिंडीत पकडून गारद करणार का याचे उत्तर येत्या लोकसभा निवडणुकीत पाहण्यास मिळणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसवर तटकरेंचा कब्जा होता. तटकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायत ते आमदार, खासदार ते राज्यातील मंत्रिमंडळापर्यंत मंत्रिपद स्वतःच्या घरात मिळवून सत्ता हस्तगत केली. सत्तेच्या व जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्या मागील दहा वर्षाच्या काळात तटकरेंच्या हाती राहिल्या.

रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत असताना व सत्तेची फळे चाखत असताना त्याचा फायदा फक्त तटकरेंच्या घरातच आणि कुटुंबापुरता राहिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचा रायगडातील इतिहास काढला तर स्पष्टपणे पाहण्यास मिळते. पुतण्या, भाऊ, भावजय, मुलगी, मुलगा व स्वतः. सुनील तटकरे असा राष्ट्रवादीच्या घराणेशाहीचा प्रवास तटकरेंच्या घरातच राहिला आहे. 

रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला, मात्र माणगाव, श्रीवर्धन, रोहा, तळा, म्हसळा, मुरुड व सुधागड या तालुक्यापुरतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद सीमित राहिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत, खालापूर, खोपोली या ठिकाणी वाढला. मात्र, त्याचे श्रेय कर्जत – खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांना जाते. परंतु 2019 च्या निवडणुकीत सुरेश लाड यांचा पराभव झाला व त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष केवळ श्रीवर्धन विधानसभा व रायगड लोकसभा मतदारसंघापूरता मर्यादित रंजीला. रायगड लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव करून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे रायगड लोकसभा मतदारसंघाकडे मागील चार वर्षात पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.   

रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांनी 31,255 मतांनी आघाडी घेत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर कोविडच्या दोन वर्षात श्रीवर्धन, महाड आणि पेण विधानसभा मतदारसंघ वगळता अलिबाग, दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघाकडे खासदार म्हणून तटकरे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.  

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तटकरे यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाच वर्षात तटकरेंकडून पाळली गेली का ? अथवा त्या आश्वासनांची पूर्तता तटकरे यांनी किती केली ? असा सवाल रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील जनता विचारत आहे. मात्र या प्रश्नांची उत्तरे तटकरे आजपर्यंत देऊ शकले नाहीत. त्यांनी या पाच वर्षाच्या कालावधी जनतेशी संपर्कही केला नाही, अशी रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेची अवस्था आहे. 

खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या व विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. महायुती सरकारच्या काळात आदिती यांचा मंत्री म्हणून समावेश झाला, परंतु रायगड जिल्हा आणि त्यातही श्रीवर्धन व पेण हे दोन विधानसभा मतदार संघ वगळता त्यांचा ठसा रायगड जिल्ह्यातील अन्य क्षेत्रांवर पडला नाही. 

मागील वर्षी झालेल्या कोकण शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे तसेच तटकरेंचे जवळचे संबंध असणारे शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव झाल्याने शेतकरी कामगार पक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यापासून दुरावला आहे. 

रायगड जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात वाकबदार व चतुर असलेले सुनील तटकरे 2019 पूर्वी पायाला भिंगरी लावून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात फिरत असत. मात्र 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर व त्यानंतर आलेल्या कोविड साथीच्या रोगानंतर तटकरे मतदारसंघामध्ये दिसेनासे झाले. 

मतदारसंघातील रस्ते, रेल्वे, मच्छीमारांचे प्रश्न, औद्योगिक वसाहतीमधील बेरोजगारी, आंबा उत्पादकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवेसंदर्भातील प्रश्न यासारख्या असंख्य प्रश्नांची केंद्राकडून सोडवणूक होते, त्याबाबत तटकरेंनी किती कार्यवाही केली, किती प्रश्नांना वाचा फोडली व त्यातील किती मार्गी लागले हा मतदारसंघातील जनतेसमोर पडलेला गहन प्रश्न आहे.  2019 मध्ये निवडून आल्यानंतर खासदार म्हणून तटकरेंनी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबार अथवा अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या नाहीत. मतदारसंघात फेरफटका मारल्यानंतर जनतेच्या मनात असलेला प्रश्न संशोधनाचा विषय ठरत आहे. 

लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या त्या – त्या तालुक्यात किती बैठका घेतल्या? त्यातून किती प्रश्न मार्गी लागले, असा सवाल या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून आता विचारला जाऊ लागला आहे. 

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा तटकरेंचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात 37 हजार 744 एवढ्या मतांची आघाडी मिळाल्यामुळे सुनील तटकरे 31 हजार 225 मतांनी विजयी झाले होते. मात्र त्याच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, सर्वसामान्यांची एसटी सेवा, दूरध्वनी सेवा, मोबाईल सेवा,  आरोग्य या प्रश्नांची सोडवणूक झाली का? असा प्रश्न श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. 

लोकसभा निवडणूक कोण लढवणार?

खासदार म्हणून सुनील तटकरे यांनी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रवादीची सत्ता फक्त घरपूरती शाबूत ठेवणे, ज्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने तटकरे मोठे झाले, त्याच पवारांच्या पक्षाला सुरुंग लावून अजित पवारांच्या गटात सामील होणे या कारणामुळे शरद पवारांच्या विचारसरणीशी निष्ठावंत असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते तटकरे यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक तटकरेंना जड जाईल, असे संकेत आहेत. त्याचमुळे तटकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र ही जागा अजित पवार सोडणार नसल्याने पुन्हा एकदा मतदारांच्या असंतोषाला सामोरे जावे लागणार, या भीतीमुळे ते अस्वस्थ होते.  

राजकीय कारकिर्दीमध्ये एकदा आलेली संधी व सुरुवातीलाच मिळालेले पद आणि एकदा सोडलेली जागा पुन्हा मिळत नसते, हे राजकारणातलं गणित आहे. त्यामुळेच की काय त्यांनी स्वतः ऐवजी मुलीला या निवडणुकीत उतरविण्याचा चंग बांधला होता. मात्र रायगड लोकसभा मतदारसंघाचे गणित मुलीला जमण्यासारखे नसल्याने त्याच्यासाठी येथे “जातीचे पाहिजे, येडा गबाळ्याचे काम नाही” या म्हणीप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांची चाचपणी केली. प्रत्येक तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.   

तटकरेंचे शत्रू व तटकरेंचे मित्र ?

पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली व गुहागर या विधानसभा मतदारसंघात तटकरेंचे नेमके शत्रू कोण व मैत्रीपूर्ण संबंध असणारे किती लोक आहेत? याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मागील चार वर्षात या मतदारसंघाचा तटकरे यांनी लेखाजोखा मांडल्यास तो शून्य येऊ शकतो, याची कल्पना दस्तरखुद्द सुनील तटकरे यांना देखील आहे.

या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दापोली विधानसभा मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे सुनील तटकरे यांचे मित्र, माजी आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. तसेच एके वेळी तटकरेंचे दुसरे मित्र असणारे गुहागरचे आमदार भास्करराव जाधव हे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. या विधानसभा मतदारसंघात तटकरे यांना केवळ 5002 मतांचीच आघाडी मिळाली होती. तटकरे व भास्करराव जाधव आता दोघेही वेगवेगळ्या पक्षात असल्याने तटकरे यांना दापोलीपासून गुहागरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

महाड, पेण व अलिबाग या विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित देखील तटकरेंच्या बाजूने नाही. महाड व अलिबाग या दोन मतदारसंघातील आमदार अनुक्रमे भरत गोगावले व महेंद्र दळवी हे दोन्हीही शिंदे गटात आहेत, तर पेणचे विद्यमान आमदार रवीशेठ पाटील हे भाजपाचे आमदार आहेत. महाड व अलिबागचे विद्यमान आमदार या दोघांनीही महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगडचे पालकमंत्रीपद भूषविणाऱ्या आदिती तटकरे यांना केलेला विरोध व पुन्हा गोगावले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याअगोदरच महायुती सरकारमध्ये आदिती तटकरे यांचा मंत्री म्हणून समावेश झाल्याने शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. हे सर्व नेते तटकरेंना निवडणुकीच्या वेळी किती मदत करेल हा संशोधनाचा विषय आहे.  त्याच पद्धतीने “तटकरे नको, भाजपाकडून धैर्यशील पाटील हवे” अशी माणगावातील मेळाव्यात झालेली मागणी, भाजपाचे पेण विधानसभेतील आमदार रवीशेठ पाटील हे किती मदत करतील हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. 

त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते विरुद्ध तटकरे या संघर्षाच्या सामन्यात कोण बाजी मारणार? तटकरेंचा वारू रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरच रोखणार का? हे येणाऱ्या निवडणुकीतच पाहण्यास मिळणार आहे. सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी नाराज असलेला भाजपाचा कार्यकर्ता, या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची तटकरे यांच्या विरोधातील वातावरण अद्याप धुमसतेच आहे. नेत्यांची मने जुळली, मात्र कार्यकर्त्यांची मने जुळत नसल्याने उमेदवारी अर्ज भरेपर्यंत तटकरेंना कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल. त्यातून विरोधी पक्षाकडून होणारे आरोप – प्रत्यारोप यामुळे तटकरेंना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे संकेत आत्तापासूनच प्राप्त होत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here