@maharashtracity

धुळे: धुळे शहरासह जिल्ह्यात आज सलग चवथ्या दिवशी पावसाचा जोर कायम (heavy rain in Dhule) आहे. दुपारी एक वाजेनंतर एक ते दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील मिल परिसरासह चाळीसगाव रोड, पेठ परिसरातील खोल गल्ली, देवपुरातील मोती नाला किनारच्या काही वसाहतीत पाणी शिरले.

तसेच बडगुजर प्लॉट भागातून वाहणार्‍या लेंडी नाल्याला पूर आल्याने या भागातील काही घरांमध्ये पाणी शिरले. जिल्ह्यात सुध्दा धुळे, साक्री, शिरपुर, शिंदखेडा तालुक्यात सततधार पाऊस होत आहे.

शहरासह जिल्ह्यात बुधवार सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक ७७.८ मि.मी. पाऊस धुळे शहरात झाला.

शहरात मंगळवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री दिड ते दोन वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरु हेाती. यामुळे शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

देवपुरातील जयहिंद कॉलनी, इंदिरा गार्डन, भरत नगर तसेच झाशी राणी पुतळा, खोल गल्ली, अंडाकृती उद्योन, बारापत्थर भागात पाणी साचले आहे. शहरातील मिल परिसरात असलेल्या श्रीरामनगर, साईदर्शन कॉलनीत पाणी शिरले.

शहरातील बडगुजर प्लॉट परिसरातून वाहणार्‍या लेंडी नाल्याला पूर आला. नाल्याच्या काठावर राहणार्‍या काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या भागातील अनेक रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी सचले होतेे. तसेच हाजीनगर, म्युनिसिपल कॉलनी, वडजाई रोडवरील बोरसेनगरातही पाणी शिरले.

धुळे जिल्ह्यातील अन्य भागातही कमी, अधिक स्वरूपात पाऊस सुरु आहे. विशेषता धुळे तालुक्यात बोरकुंड व शिरुड मंडळात मागील चार दिवसांपासून सातत्याने जोरदार अतिवृष्टी होत आहे, या भागात एका दिवसात शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद देखील झालेली आहे.

यामुळे परिसरातील निमगुळ, धामणगाव, बोधगाव, खोरदड, मोरदड, चांदे, तरवाडे, विंचुर, नाणे, सिताने, नंदाळे, होरपाडा, कुळथे, धाडरी, हेंद्रुन, मोघण, रतनपुरा, मांडळ, जुनवणे, विसरणे, वेल्हाणे, कुंडाणे, बाबरे, या गावांमध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक शेतांमध्ये पाणी साचून असल्यामुळे पीक वाया गेल्यात जमा आहे, नदीकाठच्या शेतांमध्ये देखील पाणी साचून आहे, खळ्यामध्ये असलेली शेती उपयुक्त साहित्य, चारा, गुरे वाहून गेली त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल आहे. तसेच घरांची पडझड देखील मोठ्या प्रमाणावर झालेली आहे,

दरम्यान, तापी नदीवरील (Tapi river) सुलवाडे मध्यम प्रकल्पाचे (Sulwade barrage) ७ दरवाजे २ मीटरने उघडले आहे. बॅरेजमधून ३७ हजार ६२९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे (Akkalpada Medium barrage) सर्व दरवाजे बंद आहे. जामखेडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून, ७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात ५ टक्के वाढ झाली. आता मध्यम प्रकल्पात ४५.८२ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पात २४. ९८ टक्के जलसाठा आहे.

नकाणे तलाव (Nakane dam) ४१ टक्के भरला आहे. जामखेडी, कनोली शंभर टक्के भरले आहे. लाटीपाडा प्रकल्पात ८४ टक्के तर मालनगाव प्रकल्पात ८७ टक्के पाणीसाठा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here