@maharashtracity
राजावाडी रुग्णालयातील डाॅक्टरांच्या प्रयत्नांना अपयश,
जननेंद्रियांसह पोटावर शस्त्रक्रिया
मुंबई: मुंबई साकीनाका येथे हिणकस बलात्कार घटना (Sakinaka rape case) घडली. यात मानवी वासनेला बळी ठरलेल्या ३२ वर्षीय पीडितेने राजावाडी रुग्णालयात २८ तास मृत्यूशी झुंज दिली. मात्र एवढ्या मोठ्या यातनेच्या उपचारादरम्यान पीडितेचा रुग्णालयात मृत्यू झाला.
पीडीतेला वाचवण्यासाठी राजावाडी रुग्णालयातील डाॅक्टरांनी सर्वकष प्रयत्न केले. मात्र, तिला वाचवण्यात डाॅक्टरांना अपयश आल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाची डाॅ. विद्या ठाकूर यांनी दिली. पीडितेच्या जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराच्या बाह्य आणि अंतर्गत भागांवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असल्याचे सांगण्यात आले.
ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. या महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) साकीनाका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उपचारांसाठी दाखल केले.
याप्रकरणी बोलताना रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले की, पीडित महिलेला शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शनिवारी सकाळी ११.३० वाजता तिचा मृत्यू झाला.
महिलेला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. दाखल झाल्यापासून ती व्हेंटिलेटरवर होती. महिलेच्या जननेंद्रियाच्या भागाला गंभीर दुखापत झाली होती. शरीराच्या काही भागावर जखमांव्यतिरिक्त, पोटाच्या आतील भागावर मार लागला होता. ७ डॉक्टरांच्या चमूने महिलेच्या जननेंद्रियांवर आणि इतर भागांवर शस्त्रक्रिया केली. मात्र, शवविच्छेदन अहवालाबाबत काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला.
हे प्रकरण संवेदनशील आहे आणि पोलीस त्याबद्दल अधिक माहिती देतील. दरम्यान, या घटनेमुळे नराधमाला कठोर शिक्षा करून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी सर्वच स्तरावरुन होत आहे.