@maharashtracity

सोयाबीन –कापूस आंदोलन पेटणार!

१८ नोव्हेंला गावागावात प्रभातफेरी व धरणे

१९ ला रास्तारोको तर २० ला गावबंद आंदोलन.

नागपूर: शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन आंदोलनाची हाक दिली आहे.

दिनांक १७ नोव्हेंबरपासून देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर येथील संविधान चौकात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बेमुदत सत्याग्रहाला सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र केले जाणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी व रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) विदर्भ (Vidarbha), मराठवाड्याचा (Marathwada) पूर्ण दौरा करून सोयाबीन (Soyabean), कापूस (cotton grower belt) पट्टा ढवळून काढला आहे. त्यानंतर राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आंदोलनाची घोषणा केली.

नागपूर (Nagpur) हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी देशाला संविधान दिले. मात्र, या सरकारने शेतकरी (Farmers), शेतमजूर (farm labour) आणि सर्वसामान्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे.

ही संविधानाची पायमल्ली आहे. त्यामुळे संविधानाप्रमाणे वागा असा सत्ताधाऱ्यांना संदेश देण्यासाठी संविधान चौकात हे आंदोलन केले जाणार आहे. शिवाय केंद्र सरकारचा अप्रत्यक्ष केंद्रबिंदू नागपुरात आहे, त्या अनुषंगाने देखील येथे हे आंदोलन केले जात असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य एल्गार मोर्चा निघाला होता. त्यामोर्चामध्येच तुपकरांनी विदर्भ, मराठवाड्यात आंदोलनाची घोषणा केली होती.

त्यानंतर राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी मराठवाडा व पश्चिम विदर्भाचा दौरा केला असून कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये आंदोलनाचे बळ भरले आहे. त्यानंतर मेहकर येथे त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दिनांक १७ नोव्हेंबरपासून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपुरातील संविधान चौकात बेमुदत सत्याग्रह सुरु केला जाईल. १८ नोव्हेंबरला मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक गावातील शेतकरी गावात फेरी काढुन चावडीवर किंवा पारावर धरणे व ठिय्या आंदोलन सुरु करणार आहेत.

त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात रास्तारोको आंदोलन केले जाईल व २० नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावात गावबंद आंदोलन केले जाणार आहे, याउपरही या आंदोलनाची दखल न घेतल्यास २१ नोव्हेंबरपासून कायदा हातात घेऊन आंदोलनाचा भडका उडविणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

सोयाबीनचे भाव किमान आठ हजारांवर स्थिर राहावे यासाठी सोयाबीनची पेंड आयात करणे थांबवावे, पामतेल व खाद्य तेलावरील कमी केलेला आयात कर (import duty on edible oil) पुन्हा जसाच्या तसा लावावा, कर्जमाफीचे (loan waiver) पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यातजमा झाले नाही ते अदा करावे अशा शेतकरी संघटनेच्या मागण्या आहेत.

नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे, पीकविमा नाकारणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करुन गेल्यावर्षीचा आणि यावर्षीचा पीकविमा अदा करावा, महावितरणद्वारे सुरु असलेले वीज कनेक्शन कापण्याची मोहीम बंद करावी आणि शेतातील भारनियमन बंद करावे यासह सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात असल्याची माहिती राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी दिली.

या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी पक्ष भेद विसरून शेतकरी म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here