@maharashtracity

विधीसेवा प्राधिकरण सचिव न्या.डॉ.डोंगरेंचे नगरसेवकांना आवाहन

धुळे: लोक अदालतीच्या (Lok Adalat) माध्यमातून लोकाभिमुख योजना राबविण्यात येतात. तसेच वेगवेगळे तंटे, वाद मिटविण्यात येतात. यातून वेळेची आणि पैशांची बचत होते. शिवाय, वादी, प्रतिवादी यांची मानसिक तणावातून मुक्तता होते. यामुळे लोक अदालतीच्या लोकाभिमुख योजना सर्वसामान्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम लोकप्रतिनीधींनी करावे, असे आवाहन जिल्हा दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती डॉ.डी.यु.डोंगरे यांनी केले.

धुळे महानगर पालिकेत (DMC) न्यायाधीश डॉ.डी.यू.डोंगरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला आयुक्त अजीज शेख, स्थासी समिती सभापती संजय जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदनाताई थोरात, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, सभागृह नेते राजेश पवार आदी उपस्थितीत होते.

यावेळी न्या.डोंगरे म्हणाले की, धुळे शहराची ओळख तंटामुक्त शहर म्हणून व्हावी व आपसातील वाद सामोपचाराने मिटवून वादमुक्त शहराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. लोक प्रतिनिधीच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत न्यायालयाच्या लोकाभिमुख योजना पोहचव्यात, हा विधीसेवा प्राधिकरणाचा उद्देश आहे.

विधीसेवा प्राधिकरणामार्फत व न्यायालयामार्फत नागरीकांसाठी विविध सकारात्मक उपक्रम राबविण्यात येतात. त्यात मोफत विधी सहाय्य, गरजू नागरीकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला, महिलांसाठी मनोधैर्य योजना, अशा विविध योजना राबविण्यात येतात. तसेच अपघात नुकसान भरपाई दावा, कौटुंबिक वाद, वित्तीय संस्थाचे कर्ज प्रकरणी तडजोड, या सारख्या बाबी लोक अदालतीमधून समन्वयाने निकाली काढण्यात येतात.

यातून सर्वसामान्य नागरीकांची वेळेची व खर्चाची बचत होते. शिवाय, त्यांची मानसिक तणावातून मुक्तता होते. या गोष्टी लोक अदालतीच्या माध्यमातून होत असल्याने आपआपल्या भागातील नागरीकांना याचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच या लोकाभिमुख योजना नागरीकांपर्यंत पोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे,असे आवाहन न्या.डोंगरे यांनी नगरसेवकांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here