मुंबई: मुंबई महापालिकेच्या घनकचरा खात्यात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जुन्या वसाहतींचा पालिकेतर्फे लवकरच पुनर्विकास करण्यात येणार आहे. वसाहतींचा पुनर्विकासानंतर त्यांना किमान ३०० चौ. फुटांची नवीन घरे राहायला मिळणार आहेत. सध्या हे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय १५० चौ.फुटांच्या घरात दाटीवाटीने राहत आहेत.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा खात्याअंतर्गत दोन पाळ्यांमध्ये २९ हजार ६१८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. पालिकेच्या विविध ४६ ठिकाणी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये सध्या ५ हजार ५९२ कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्यात आली आहेत.

चाळी व इमारती या स्वरूपातील या वसाहती सन १९६२ मध्ये निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये १५० चौ. फुटांची घरे असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वाढत्या कुटुंबासाठी ही घरे अपुरी पडत आहेत. त्यामुळेच पालिकेने या वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा व त्याद्वारे सफाई कर्मचार्यांना दुप्पट क्षेत्रफळाची घरे देण्याचा म्हणजेच ३०० चौ.फुटांची घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.

यात ४६ पैकी ३४ वसाहतींचा पुनर्विकास करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यापैकी तीन वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजूरीसाठी येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या ‘ए’ वार्डातील राजवाडकर स्ट्रीट, पलटन रोड आणि ‘बी’ वार्डातील वालपाखाडी या तीन वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

त्यासाठी पालिकेकडून मेसर्स देव इंजिनिअर्स आणि मेसर्स ट्रान्सकॉन शेठ क्रियेटर्स प्रा. लि. या कंत्राटदारांना तब्बल ५२६ कोटी रुपयांचे कंत्राट काम देण्यात येणार आहे.

प्रति चौ. मिटरसाठी ५० हजार ३०३ रुपये या दराने अंदाजे ७९ हजार ३०२ चौ.मिटर बांधकाम, ४% सादिलवार रक्कम, पाणी पट्टी, मलनि:सारण व पर्यवेक्षण आकार आदींपोटी एकूण ५२६ कोटी रुपये खर्च येणार आहे.

मात्र या सर्व कामांची पूर्तता होण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागणार आहे.

असा होणार पुनर्विकास

सध्या पालिकेच्या राजवाडकर वसाहतीचे क्षेत्रफळ ४१६६.९ चौ.मिटर एवढे असून १५५ घरे आहेत. १.३३ एफएसआय वापरून पुनर्विकास कामानंतर तेथे ३०० चौ. फुटांची १२० घरे निर्माण करण्यात येणार आहेत.

तसेच, पलटन रोड वसाहतीचे क्षेत्रफळ ५,२९१.७ चौ. मिटर इतके असून तेथे सध्या २९६ घरे आहेत. ५.४० एफएसआय वापरून पुनर्विकास कामानंतर त्या ठिकाणी ३०० चौ. फुटांची ५२२ घरे आणि ६०० चौ. फुटांची १६ घरे निर्माण करण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे, वालपाखाडी वसाहतीचे क्षेत्रफळ ६,०९७ चौ. मिटर इतके असून तेथे सध्या ३७६ घरे आहेत. ५.४० एफएसआय वापरून पुनर्विकास कामानंतर त्या ठिकाणी ३०० चौ. फुटांची ५६८ घरे आणि ६०० चौ. फुटांची ६६ घरे निर्माण करण्यात येणार आहेत.

एकूण ३०० चौ. फुटांची १२०० घरे तर ६०० चौ. फुटांची ८२ अशी एकूण १२८२ घरांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here