@maharashtracity

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते रुपालीला घराची चावी सुपूर्द

ठाणे: रेल्वे अपघाता दोन्ही पाय गमावलेल्या रुपाली मोरे (वय 14) हिला ठाणे महानगरपालिकेच्यावतीने हक्काचे घर देऊन शिवसेनेने आपला शब्द पाळला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते तिला नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुपाली ही ट्रेनमध्ये चढली. मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलच्या खाली पडली. या दुर्घटनेत दुर्दैवाने तिला दोन्ही पाय गमवावे लागले होते.

या दुर्घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार उपलब्ध करून दिले.

यासोबतच शिवसेनेच्यावतीने (Shiv Sena) तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील पक्षाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

मूळच्या मानपाडा येथे राहणाऱ्या रुपालीकडे हक्काचं घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation – TMC) वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज शिंदे यांच्या निवासस्थानी रुपाली हिला तिच्या या नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

रुपाली हिच्यावर नियतीने घाला घातला असला तरीही तीला पुन्हा तिच्या पायवर उभे करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील शिवसेनेने उचलला होता. आता तिला हक्काच घरकुल देऊन तिच्यासमोरील निवाऱ्याचा प्रश्नही निकाली काढला आहे.

Also Read: निवडणूक आचारसंहितेमुळे विकासकामांचे प्रस्ताव रखडले

ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने तिला ठाण्यात घरकुल उपलब्ध करून देऊन शिवसेनेने आपला दिलेला शब्द पाळला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde), ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here